अकोला दि.12 :- जिल्हा महिला व बाल विकास विभाग व जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्यावतीने मंगळवारी (दि.10) मोहिरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक विद्यालय, अकोला येथे बालकांचे कायदे यांची प्रभावी अंमलबजावणी या विषयावर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते बाल कल्याण समिती अध्यक्ष ॲड. अनिता गुरव यांनी ‘बालकांचे लैंगीक अपराधापासुन संरक्षण अधिनियम’ या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच बाल कल्याण समितीचे सदस्य प्रांजली जयस्वाल यांनी ‘बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम, याबाबत माहिती दिली. तर नितीन अहिर यांनी मोबाईलचे वाढते दुष्परीणाम व आजची वास्तविक परिस्थिती यावर मार्गदर्शन केले.
जिल्हाधिकारी निमा अरोरा व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विलास मरसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हा परिविक्षा अधिकारी गिरिष पुसदकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजु लाडुलकर, मोहिरीदेवी खंडेलवाल विद्यालयाचे मुख्याध्यापिका श्रीमती. वाजगे, पर्यवेक्षिका श्रीमती. बागडे, शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.