अकोला, दि. 11 राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील जिल्हा न्यायालय व तालुका न्यायालयांमध्ये शनिवार दि. 11 फेब्रुवारी 2023 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाचे सचिव योगेश पैठणकर यांनी दिली आहे.
राष्ट्रीय लोक अदालत शनिवार दि.11 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेपाच यावेळात जिल्हा न्यायालय व तालुका न्यायालयांमध्ये होईल. या अदालतीत धनादेश अनादर, बॅंकेचे कर्ज वसूली, कामगारांचे वाद, विद्युत पाणी देयक, आपापसात तडजोड करण्याजोगे प्रकरण इ. दाखल पूर्व प्रकरणे तसेच न्यायालयातील प्रलंबित प्रकरणा मधील महसूल, भूसंपादन, दिवाणी प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाई , वैवाहिक वाद. इ. प्रकरणांवर कामकाज होईल.
लोकअदालतीच्या निवाड्याविरुद्ध अपिल होत नाही. एकाच निर्णयात कोर्टबाजीतून सुटका होते. निकाल झटपट लागतो. दोन्ही पक्षांना समाधान होते. तरी ज्या पक्षकारांची प्रकरणे ही न्यायलायत प्रलंबित आहेत, अथवा न्यायालयात दाखल व्हावयाची आहेत. त्यांनी आपली प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतीत सुनावणीसाठी दाखल करावी असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष श्रीमती एस. के. केवले व सचिव योगेश पैठणकर यांनी केले आहे.