अकोला दि.22:- ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका, जिल्हा परिषद या सारख्या संस्थांना दिव्यांगांच्या कल्याणासाठी वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यासाठी पाच टक्के निधी दिला जातो. हा निधी दिव्यांगाच्या कल्याणासाठी तातडीने खर्च करा, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी संबधित विभागाला दिले.
जिल्हाधिकारी यांच्या दालनात दिव्यांग कल्याण निधी खर्च आढावा बैठक पार पडली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे, जिल्हा नियोजन अधिकारी गजानन सुरंजे, नगरपालिका प्रशासन अधिकारी शेषराव टाले तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
दिव्यांगांना वैयक्तिक लाभ देऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी दिव्यांग कल्याण निधी दिला जातो. हा निधी त्यांच्यासाठी खर्च होत असल्याची सर्व विभागानी खातरजमा करावी. ज्या विभागानी दिव्यांग निधी खर्च केल्या नाही त्यांनी तातडीने खर्च करावा. निधी खर्च न केल्यास संबंधितावर कारवाई केल्या जाईल, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले. तसेच दिव्यांगाच्या कल्याणासाठी सर्व कार्यालयामध्ये दिव्यांग कक्ष स्थापन करुन दिव्यांग अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, असे निर्देश यावेळी देण्यात आले.