अकोला दि.20 :- पिकांची उत्पादकता वाढ व शेतकऱ्यांना प्रोत्साहन करण्यासाठी कृषि आयुक्तालय पुणे मार्फत रब्बी पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस या पाच रब्बी पिकांची निवड करण्यात आली असून स्पर्धेकरीता शनिवार दि. 31 डिसेंबरपर्यंत अर्ज मागविले आहे. जिल्ह्यातील शेतकरी बांधवानी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषि आयुक्तालय पुणेचे कृषि संचालक(विस्तार व प्रशिक्षण) विकास पाटील यांनी केले.
जिल्ह्यात पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देवून विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव केल्यास, त्यांचे मनोबल वाढण्यास मदत होते. त्यामुळे ते अधिक उमेदीने नवनवीन व अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करुन कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. त्यांचे मार्गदर्शन परीसरातील इतर शेतकऱ्यांना होवून जिल्ह्याच्या तसेच राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडण्यास मदत होईल. हा उद्देश ठेवून कृषी विभागामार्फत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येते.
स्पर्धेतील पीके व अटीशर्ती
रब्बी पिके : ज्वारी, गहू, हरभरा,करडई व जवस असे एकूण पाच पिके. पीक स्पर्धेतील पिकांची निवड करताना त्या पिकांचे तालुक्यातील एकूण लागवड क्षेत्र किमान 1000 हेक्टर असावे. तथापि संबंधित पिकाखालील क्षेत्र 1000 हेक्टर पेक्षा कमी असल्यास व स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावयाचा असल्यास कृषि संचालक (विस्तार व प्रशिक्षण) यांची विहीत मार्गाने लेखी परवानगी घेणे बंधनकारक आहे. पिक स्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीचे स्वतःच्या शेतावर त्या पीकाखाली भात पिकासाठी किमान 20 आर व इतर पिकासाठी 40 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक राहिल.
स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क
सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी पीकनिहाय (प्रत्येक पिकांसाठी स्वतंत्र) रक्कम रु. 300 राहील, तालुकास्तरावर स्पर्धा आयोजनासाठी सर्वसाधारण गटासाठी किमान 10 व आदिवासी गटासाठी किमान पाच यापेक्षा प्रवेश अर्ज कमी असल्यास, पिकस्पर्धा रद्द करण्यात येऊन प्रवेश शुल्क परत देण्यांत येईल.
विजेत्या शेतकऱ्यांना बक्षिस
पिक स्पर्धेत विजेते ठरलेल्या सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरावर पहिले पारितोषीक 5 हजार रुपये, व्दितीय पारितोषीक 3 हजार रुपये व तिसरे पारितोषीक 2 हजार रुपये. जिल्हास्तरावरील विजेत्यांसाठी पहिले पारितोषीक 10 हजार रुपये, व्दितीय पारितोषीक 7 हजार रुपये व तिसरे पारितोषीक 5 हजार रुपये आणि राज्यस्तरावरील विजेत्यांसाठी पहिले पारितोषीक 50 हजार रुपये, व्दितीय पारितोषीक 40 हजार रुपये व तिसरे पारितोषीक 30 हजार रुपये मिळेल.
रब्बी हंगामातील दुय्यम तसेच पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ होण्यासाठी शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषि आयुक्तालयामार्फत करण्यात आले आहे.