अकोला, दि.17 :- जिल्ह्यातील ग्रामीण, प्रभाव व नागरी क्षेत्रासाठी सन 2023-24 करिता वार्षिक मूल्यदर तक्ते तयार करण्याच्या संदर्भात आज निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्र. जिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात बैठक पार पडली. यावेळी विधानपरिषद सदस्य आमदार वसंतराव खंडेलवाल व विधानसभा सदस्य आमदार रणधीर सावरकर उपस्थिती होते. मूल्यदर निर्धारित करताना लोकभिमुख व पारदर्शक होईल याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. अमरावती विभागाचे सहायक संचालक नगर रचना (मूल्यांकन) प्रवीण पेटे, नोंदणी व मुद्राक विभागाचे सहा. जिल्हा निबंधक रमेश पगार, अधिकारी व कर्मचारी आदि उपस्थित होते.
या बैठकीत माहिती देण्यात आली की, नव्या महसुली गावांचा समावेश करणे, नावातील दुरुस्ती, ग्रामीण क्षेत्रातील राष्ट्रीय/राज्य महामार्गावरील सुधारीत विभाग निश्चिती करणे, तसेच प्राप्त झालेल्या प्रस्तावांची छाननी करुन मालमत्तांचे विभाग निश्चित करणे इ. दुरुस्त्यांसह वार्षिक मुल्य दरतक्ते निर्दोष करण्यात आले, अशी माहिती अमरावती विभागाचे सहायक संचालक नगर रचना (मूल्यांकन) प्रवीण पेटे यांनी दिली आहे.