अकोला, दि.16 :- पशुसंवर्धन विभागाच्या नाविन्यपूर्ण व जिल्हास्तरीय योजनातर्गंत शेळी-मेंढी पालन दुधाळ गाई-म्हशी व कुक्कुट पालन अशा विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी दि. 11 जानेवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरीता पशुपालक, शेतकरी, सुशिक्षीत बेरोजगार युवकयुवती व महिलांनी जास्तीत जास्त अर्ज दाखल करावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांनी केले आहे.
नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेंतर्गत दुधाळ गाई-म्हशींचे गट वाटप, शेळी-मेंढी गट वाटप, 1000 मांसल कुक्कुट पक्षांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य, 100 कुक्कुट पिलांचे वाटप व 25+3 तलंगा गट वाटप अशा विविध योजनांसाठी लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सन 2022-23 वर्षाकरीता राबविली जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरीता ऑनलाईन अर्ज https.//ah.mahabms.com या संकेतस्थळावर तर अँड्रॉईड मोबाईलच्या गुगल प्लेस्टोअर्सवर AH.MAHAABMS ॲप उपलब्ध आहे. संगणक प्रणालीमध्ये अर्ज भरणे अत्यंत सुलभ व सोपी असून ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज स्विकारले जातील याची पशुपालक व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी.
अर्जदाराने अर्ज करतावेळी नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येणार असल्याने अर्जदारांने योजनेंतर्गत आपला मोबाईल क्रमांक बदलू नये. तसेच मागील वर्षी अर्ज केलेल्या किंवा अर्ज दाखल केल्यानंतर पाच वर्षापर्यंत त्यांची वैधता राहत असल्याने अर्जदारांनी पुन्हा अर्ज करावयाची आवश्यकता नाही. योजनाबाबत अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक 1962 किंवा 1800-233-0418 वर किंवा तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी(विस्तार), पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, उपआयुक्त कार्यालय, तालुका लघुपशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय किंवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा, असे आवाहन पुशसंवर्धन विभागाव्दारे करण्यात आला आहे.