तेल्हारा (प्रतिनिधी) -: महाराष्ट्रात छत्रपती शिवराय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, अशा विविध महापुरुषांबद्दल भाजपा नेत्यांकडून सातत्याने गरळ ओकण्यात येत आहे.
या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी आज आमदार अमोल मिटकरी यांचे नेतृत्वात तेल्हारा तालुक्यातील नागरिकांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून वाचाळवीरांवर कारवाई करण्यासंदर्भात तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर यांना निवेदन दिले. तसेच विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे यांनी हिवरखेड नगरपंचायत होऊ नये याकरीता जो पत्रव्यवहार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत केला तो हिवरखेड वासियांसोबत द्रोह असून त्याविरुद्ध येणारे अधिवेशनात प्रश्न उचलून धरल्या जाईल.
तसेच अकोल्याकडून तेल्हारा व हिवरखेड पर्यंत जोडल्या जाणाऱ्या रस्त्यांवर आजपर्यंत जे घाणेरडे राजकारण प्रस्थापित नेत्यांनी केले त्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन तेल्हारा शहर व तालुक्यातील विकासाकडे जातीय लक्ष देण्याचा निर्धार तरुणांना घेऊन आज करण्यात आला. मात्र याकरिता सर्व धर्मीय व सर्व पक्ष तरुणांनी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले. हे काम कोण्या एकट्याचे नसून सर्वांचे काम असल्याचे मत सर्व पक्षीय नेत्यांनी व्यक्त केले. तरुणांनी आम्हाला हाक द्यावी आम्ही 24 तास विकास कामासाठी सतर्क आहोत असा विश्वास यावेळी मिटकरी यांनी दिला. तेल्हारा तालुक्यातील रस्त्यांसाठी विशाल नांदोकार या युवकाने दोन वेळा उपोषण केले. अनेक नागरिकांनी सुद्धा विविध आंदोलने केली. परंतु तरीही हिवरखेड तेल्हारा अडसूळ आणि मुख्य रस्ते आतापर्यंत झाले नाहीत ही शोकांतिका आहे. असेही मिटकरी म्हणाले.
तेल्हारा शहरवासीयांनी मनावर घेतलं तर त्यांचा विकास कोणीच रोखु शकत नाही. तसेच हिवरखेडच्या नागरिकांनी मनावर घेतलं तर नगरपंचायत होण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही असेही आमदार मिटकरी म्हणाले. ग्रामपंचायत सदस्य कामिलअली मिरसाहेब यांनी दिलेल्या निवेदनात नगरपंचायत संदर्भात आडकाठी आणणाऱ्यांच्या विरोधात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. श्यामशील भोपळे यांनी नगरपंचायतसाठी हिवरखेडवासी कोणाच्याही दबावात न येता सर्व समावेशक लढा देण्यावर ठाम असल्याचे सांगून कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.
आमदार अमोल मिटकरी यांच्या नेतृत्वात हा धडक निषेध मोर्चा काढण्यात आला. या धडक मोर्चात आमदार अमोल मिटकरी यांचेसह रामप्रभू तराळे, पुंडलिकराव अरबट, श्यामशील भोपळे, डॉ ज्ञानेश्वर तराळे, अशोक घाटे, सुरेश ओंकारे, कामिलअली मिरसाहेब, रामाभाऊ फाटकर, विशाल नांदोकार, अमित काकड, निलेश जावोकर पवन बेलसरे, सलमान खान, धिरज बजाज, अर्जुन खिरोडकार, शाहरुख लाला, शहजाद खान, सतीश इंगळे, पुरुषोत्तम निमकर्डे, प्रकाश राऊत, संतोष राखोंडे, सुदाम राऊत, एकनाथ भोपळे, मुदस्सीर खान, अफजल खान, शे जहीर, अजमत खा, इत्यादींसह शेकडो सर्वधर्मीय नागरिकांची उपस्थिती होती.
प्रतिक्रिया:-
नगरपंचायत झाल्यावर गावाचा विकास खुंटतो आणि लोक उपासमारीने मरतात असा नवीन शोध शास्त्रज्ञ आमदार भारसाकळे यांनी लावला आहे. आ. भारसाकळे यांनी हिवरखेड नगरपंचायतवर आणलेली स्थगिती हा हिवरखेड वासियांवर अन्याय आहे. याबाबत हिवाळी अधिवेशनात पुन्हा आवाज बुलंद केल्या जाईल…आमदार अमोल मिटकरी