अकोला,दि. 8 :- सैनिकांच्या कल्याणासाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांसाठी ध्वजदिननिधी संकलन करण्यास आज ध्वजदिनानिमित्त सुरुवात करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात आज अपर जिल्हाधिकारी (प्रभारी) विश्वनाथ घुगे यांच्या हस्ते ध्वजनिधी संकलानास सुरुवात झाली. वर्ष २०२०-२१ मध्ये जिल्ह्यात देण्यात आलेल्या ७६ लाख ३० हजार रुपयांच्या ध्वजनिधी संकलनाच्या उद्दिष्टापैकी ९६ टक्के ध्वज निधी संकलन झाल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी यावेळी दिली.
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने ध्वजनिधी दिनाच्या औचित्याने ध्वजनिधी संकलन कार्यक्रमाच्या शुभारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी बाबासाहेब गाढवे, विदर्भ साहित्य संघाचे (अकोला) गजानन नारे आदींनी यावेळी ध्वजनिधी मध्ये निधी दान करून या उपक्रमाची सुरुवात केली.
ध्वज निधी संकलनाच्या माध्यमातून संकलीत होणारा निधी एका बँक खात्यात जमा करण्यात येतो. संकलित निधीतून सैनिकांच्या कल्याणासाठी योजना राबविण्यात येतात. जिल्ह्यात मागील वर्षी देण्यात आलेल्या ७६ लाख ३० रुपयांच्या ध्वजनिधी संकलनाच्या उद्दिष्टापैकी ७० लाख ४३ हजार रुपयांचा ध्वज निधी संकलन झाल्याचे आणि यावर्षीही ध्वजनिधीतून मोठी रक्कम संकलीत होणार असल्याचा विश्वास बाबासाहेब गाढवे यांनी व्यक्त केला.
असा असतो ध्वजनिधी संकलन कार्यक्रम
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने ध्वजनिधी दिन ७ डिसेंबर ते पुढील वर्षीच्या ३० नोव्हेंबर पर्यंत ध्वजनिधी संकलित करण्यात येतो. यासाठी जिल्ह्यातील शाळा,महाविद्यालयांसह शैक्षणिक संस्था, शासकीय व निमशासकीय कार्यालये, महामंडळ आदि कार्यालयांना आवाहनपत्र पाठविण्यात येते व त्यानुसार ध्वजनिधी संकलित करण्यात येतो.