अकोला,दि. 3 :- विविध स्पर्धांमध्ये नेटाने सहभाग घेवून क्रीडा आणि कलागुण वृद्धिंगत करून व्यक्तिमत्व विकास साधा, अशा शब्दात बाल न्याय मंडळाच्या अध्यक्ष शुभांगी यादव यांनी ‘जिल्हा स्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाच्या बक्षिस वितरण व समारोप प्रसंगी मार्गदर्शन केले.
येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर अकोला जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय आणि बाल कल्याण समितीच्यावतीने आयोजित या महोत्सवाच्या समारोप व बक्षिस वितरण समारंभ प्रसंगी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य ॲड. संजय सेंगर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विलास मरसाळे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी आपल्या संबोधणात श्रीमती यादव म्हणाल्या, या महोत्सवात आयोजित स्पर्धांमध्ये बक्षिस मिळविणाऱ्या सर्व मुला मुलींचे कौतुक होत असतानाच ज्यांना बक्षिस मिळाले नाही त्यांनी निराश होवू नका. स्पर्धेत सहभागी सर्वच मुल-मुली कौतुकास पात्र असल्याचे सांगत, विविध स्पर्धांमध्ये सातत्याने सहभाग घेवून क्रीडा आणि कलागुण वृद्धिंगत करून व्यक्तिमत्व विकास साधण्याचा मोलाचा सल्ला दिला. गायत्री बालिकाश्रम, सर्वोदय बालगृह, शासकीय बालगृह, उत्कर्ष शिशुगृह,डंपिंग ग्राउंडवरील संस्कार वर्गातील मुल-मुलींसह कोवीड महामारीमध्ये अनाथ झालेल्या मुल-मुलींनी या महोत्सवात सहभाग घेतला.
या महोत्सवात विविध क्रीडा व कलास्पर्धा पार पडल्या. महोत्सवात कबड्डी, क्रिकेट, धावण्याची स्पर्धा, बुद्धिबळ, गोळाफेक, लांब उडी आदि क्रीडा घेण्यात आल्या. चित्रकला, रांगोळी, निबंध, वक्तृत्व, सामूहिक व एकल नृत्य स्पर्धा आदि कला स्पर्धाही घेण्यात आल्या.
बाल कल्याण क्षेत्रात कार्यरत अकोला जिल्ह्यातील शासकीय व स्वयंसेवी संस्थांमधील पुनर्वसनासाठी दाखल असलेल्या निराधार, उन्मार्गी, एकल पालक व कोवीड महामारीमध्ये अनाथ झालेल्या मुलांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी व त्यांच्यात सांघिक भावना निर्माण होण्याच्या उद्देशाने या बाल महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते गुरुवारी या स्पर्धेचे उद्घाटन झाले. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेचा आज समारोप झाला.