अकोला,दि. 2 :- ‘जागतिक एड्स दिन’ निमित्त आरोग्य विभागाव्दारे जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीला पोलिस अधिक्षक संदीप घुगे व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयापासून आज सकाळी आठ वा. रॅली सुरु झाली. यामध्ये आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी, नर्सींग महाविद्यालय शासकीय महाविद्यालय व जिल्हा स्त्री रुगणालय अकोला, एन्जल ऑफ मर्सी इंस्टीटयुट ऑफ नर्सींग कॉलेज, शिवाजी महाविद्यालय, शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय व आरडीजी महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने सहभाग घेतला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा स्त्री रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. आरती कुलवाल, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.चिमणकर, एड्स कार्यक्रम अधिकारी दर्शन जनईकर, एआरटी नोडल अधिकारी डॉ.मुकुंद अष्टपुत्रे, एआरटी केंद्रोच डॉ. आशिष लाहोळे, डॉ. जगदिश खंडेतोड आदी उपस्थित होते.
ही रॅली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयापासून सुरु होवून जिल्हाधिकारी कार्यालय, तहसिल चौक, बस स्टॅण्ड-वाटीका मार्गे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे समारोप झाला. या रॅलीत एचआयव्ही प्रतिबंधात्मक संदेशाचे जनजागृतीपर घोषणा व बॅनरव्दारे नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. समारोप कार्यक्रमात एचआयव्हीग्रस्त रुग्णांना भेदभावाची वागणुक मिळु नये यासाठी उपस्थितांना शपथ देण्यात आली. तसेच एचआयव्ही प्रतिबंधासाठी एड्स पथकामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनाची माहिती दिली. त्यांच्या उल्लेखनिय कामगिरीकरीता जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांनी सत्कार केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माधुरी येळणे यांनी तर आभार प्रदर्शन जिल्हा पर्यवेक्षक ज्ञानेश्वर भेंडेकर यांनी केले.