अकोला,दि.30 :- सामाजिक न्याय विभागाव्दारे राबविल्या जाणाऱ्या योजना समाजातील तळागाळापर्यंत पोहोचविण्यात पत्रकारांचे मोलाचे योगदान आहे, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी आज पत्रकार कार्यशाळेत केले.
सामाजिक न्याय विभागामार्फत दि.26 नोव्हेंबर ते दि.6 डिसेंबर या कालावधीत आयोजित समता पर्वानिमित्त आज पत्रकारांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात ही कार्यशाळा पार पडली. समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड, समाज कल्याण विभागाचे अधीक्षक आर.एस.ठाकरे,वरीष्ठ समाज कल्याण निरिक्षक प्रदीप सुसतकर, उमा जोशी, जिल्हापरिषदचे समाजकल्याण निरिक्षक रुपेश हाडोळे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.मिलिंद दुसाने, जात पडताळणी समितीचे विशाल राठोड, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकतअली मिरसाहेब, मराठी पत्रकार परिषदेचे प्रदेश प्रतिनिधी सिद्धार्थ शर्मा, श्रमिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष अजय डांगे तसेच दैनिक, साप्ताहिक व इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कार्यशाळेच्या प्रारंभी सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाची माहिती डॉ.अनिता राठोड यांनी उपस्थितांना दिली. त्यानंतर जात पडताळणी समितीचे विशाल राठोड, शिष्यवृत्ती संदर्भात रुपेश डोहाळे तसेच स्वाधार योजना, जात पडताळणी समितीच कार्य इ. उपक्रमांबद्दल माहिती देण्यात आली. जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरीता विशेष शिबीरांचे आयोजन तालुकानिहाय करण्यात येत असल्याची माहितीही देण्यात आली. शौकतअली मिरसाहेब व सिद्धार्थ शर्मा यांनीही संबोधन करुन सामाजिक न्याय विभागाव्दारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजना वृत्तपत्र व विविध माध्यमांद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचविण्याकरीता प्रयत्न करु,असे आश्वस्त केले. सुत्र संचालन मनिष चोरमल यांनी केले.