अकोला,दि.१७:- गांधीग्राम जवळील पूर्णा नदीवरील पूल क्षतिग्रस्त झाल्याने पर्यायी मार्ग म्हणून गोपालखेड मार्गे जाणाऱ्या प्रस्तावित बाह्यवळण रस्त्यासाठी त्वरीत भूसंपादन प्रक्रिया राबवावी, असे निर्देश आज जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी संबंधित यंत्रणेस दिले.
गांधीग्राम येथील पूल क्षतिग्रस्त झाल्यानंतर या पुलावरुन रहदारी थांबविण्यात आली आहे. त्यामुळे लोकांना लांब अंतरावरुन जावे लागते. त्यासाठी त्वरीत पर्यायी रस्ता बांधकाम आवश्यक आहे. यासंदर्भात आज स्थानिक शेतकरी व संबंधित यंत्रणा यांची संयुक्त बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.
बैठकीस अधीक्षक भूमि अभिलेख शिरवळकर, उपजिल्हाधिकारी भूसंपादन विश्वनाथ घुगे, कार्यकारी अभियंता अनंत गणोरकर, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, नगररचनाकार साबळे आदी तसेच स्थानिक शेतकरी उपस्थित होते.
ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या प्रकल्पासाठी संपादित करावयाच्या आहेत. त्या शेतकऱ्यांशी चर्चा करण्यात आली. कोणत्या पद्धतीने भुसंपादन मोबदला हवा आहे, याबाबत सहमती शेतकऱ्यांकडून लेखी घेण्यात येईल. त्यानंतर भूसंपादन प्रक्रिया त्वरीत राबवावी व गोपालखेड मार्गे जाणाऱ्या बाह्यवळण रस्त्याचे काम तातडीने सुरु करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले.