अकोला,दि.9 :- विद्यार्थ्यांमध्ये विविध मूल्ये रूजावीत या उद्देशाने केंद्र शासनातर्फे ‘स्टुडंट पोलीस कॅडेट’ हा उपक्रम शालेयस्तरावर राबविण्यात येत आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील 36 शाळांची निवड करण्यात आली आहे. या उपक्रमाचा आढावा आज निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात स्टुडंट पोलीस कॅडेट कार्यक्रम अंमलबजावणीबाबत आढावा बैठक पार पडली. यावेळी पोलीस निरीक्षक भाऊराव घुगे, योगेश हिरुळकर, निवड झालेल्या शाळांचे मुख्याध्यापक व प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हा परिषद व महानगरपालिका शाळांमधील इयत्ता आठवी व नववीच्या निवडक विद्यार्थ्यांना ‘स्टुडंट पोलीस कॅडेट’ कार्यक्रमाअंतर्गत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याकरिता जिल्हा परिषदेच्या 13 व महानगरपालिकेच्या 23 शाळा अशा एकूण 36 शाळांची निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमाअंतर्गत निवडक विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षा आणि वाहतूक जागरूकता, भ्रष्टाचार निर्मूलन, संवेदनशीलता आणि सहानुभूती, महिला आणि बालकांची सुरक्षीतता, समाजाचा विकास, सामाजिक अपप्रवृत्तीस आळा घालणे, नीतिमूल्य, शिस्त, आपत्ती व्यवस्थापन, गुन्ह्यास प्रतिबंध याबाबत प्रशिक्षीत करण्यात येणार आहे. तसेच, उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी तर अपर पोलीस अधीक्षक सचिव म्हणून काम पाहतील. तसेच, मनपा व जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी हे सदस्य म्हणून तर संबंधित पोलीस निरीक्षकांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक भाऊराव घुगे यांनी दिली.