काय मंडळी शिर्षक वाचून दचकलात काय? होय मी “निपान” च तुम्हा वाचकांशी संवाद साधतोय. माझ्या नेहमीच्या नावाने तुम्ही मला चांगले ओळखता म्हणुन मी आज माझ्या संस्कृतमधील चक्क सहा नावांपैकी एकाला निवडलं. आवडेल तुम्हाला माझं मनोगत.
तुमच्या अकोला शहरापासून अवघ्या १४ किमी वर असलेल्या आखातवाडा येथे ब्रिटिशांनी माझी निर्मिती केली. आपल्या वऱ्हाडी भाषेत जिला तुम्ही बंडी म्हणता त्या बैलगाडीच्या आकाराचा .मी आहे माझी लांबी ६०० मिटर आणि रुंदी ४०० मिटर आहे. दक्षिणेकडच्या भागात १३४ लिटरची पाणी संकलित करण्याची व्यवस्था गोऱ्या साहेबाने तेव्हा केली होती. माझ्या परिसरात एक विहीर सुध्दा आहे पण ती आता गाळाने लपली आहे. तसेच पश्चिमेला एक सांडवासुद्धा आहे चांगला ६ फुटाची भिंत बांधुन केलेला. तेव्हा त्याचं रूपड जणुकाही धबधबाच दिसायचा. मी तर हरकुनच जायचो. पण आता कालानुरूप माझ्यामध्ये बरेच परिवर्तन झाले. माझ्या अंगणात बंगाली बाभुळ अस्ताव्यस्त हातपाय पसरुन, दादागिरी करून इतर वृक्षांवर जरब बसवायची. तिला कंटाळून माझ्या कोशातील पाणी सतत पळून जायचे. मग सामाजिक वनीकरण विभाग, अकोला आणि लघुपाटबंधारे विभाग अकोला ह्यांनी मला ममतेने न्हाऊमाखु घालुन माझं स्वरुप खुलवलं, तसेच कृषी विभागाच्या पुढाकारातून स्थानिक रहिवाशांच्या सहभागातून साफसफाई, बाभुळीला हद्दपार करुन तसेच साचलेला गाळाचा उपसा करून मला खुप सजवले. वनविभागाच्या प्रयत्नांमुळे रोपवाटिका मुर्त स्वरुपात लवकरच येणार असल्याची गोड बातमी मला कळली आहे.
आता माझे वरील मनोगत वाचुन तुम्हा सगळ्यांना कळलेच असेल की मी कोण म्हणुन. माझ्या परिसरात विविध प्रकारच्या द्विजगण हजेरी लावत असतात. ही मंडळी इतक्या निर्धास्तपणे इथे वावरते की असं वाटतं जणु काही “द्विजगणांनी येथे तुम्हा लोकांसारखी एक नगरीच वसविली आहे. यामध्ये स्थानिक पक्षांबरोबरच स्थलांतरित खगही मोठ्या संख्येने मुक्कामी असतात. त्यांचे विविध अविष्कार निरखतांना, आलाप ऐकतांना तुम्हा लोकांना भावसमाधीचा प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही.
आता तुमची उत्सुकता नक्कीच वाढली असणार की कोणते कोणते पक्षी माझ्या अंगणात मुक्कामी असतात. त्यामध्ये काही स्थानिक, भटके, स्थलांतरित, रहिवासी पक्षी येथे स्वच्छंदी पणे विहरतात. कोकिळ,कावळे, होले, चिमण्या, पोपट, कोतवाल,भारद्वाज, सुर्यपक्षी, वेडेराघु, वटवटे, बुलबुल, सातभाई, गायबगळे, मैना, ब्राम्हणी मैना, भोरड्या, टिटवी, खंड्या, पाकोळ्या, पारवे, गांधारी, भिंगरी, तारशेपटी भिंगरी, हुप्पी, निळकंठ, शिंपी, दयाळ, चिरक, चंडोल, ह्यांचेशिवाय नकट्या,सररुची,गढवाल, हळदीकुंकू,सुरुची,वारकरी,अडई ,चक्रवाक,लालसरी ही रानबदके, तर ढोंगी बगळा, छोटा बगळा, गायबगळा, राखी बगळा, मुग्धबलाक, चित्रबलाक,पांढरा शराटी, काळा शराटी, चमचा, पाणकावळा, तिरंदाज, शेकाट्या, नदीसुरय, लाजरी पाणकोंबडी, फटाकडी, कंठेरी चिखल्या, बंड्या, खंड्या धीवर, शंकर,दलदल ससाणा, कपाशी घार ही सगळी मंडळी माझ्या परिसरामध्ये मुक्त विहार करित असते.त्यांना न्याहारायचं म्हणजे एक निर्मळ आनंद अनुभवणेच असतो. माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की सुटीच्या दिवशी अथवा जेव्हा तुम्हाला तुमच्या दैनंदिनीतुन मोकळा वेळ मिळेल तेव्हा माझ्याकडे या.येथे दोन निरीक्षण मनोरे आहेत त्यावर बसुन मला न्याहाळा आणि एक आगळी वेगळी अनुभूती घ्या. विशेष नोंद म्हणजे माझ्या भवतालमध्ये चक्क सायबेरिया हुन येणारे कांडे करकोचे देखील मुक्काम करतात ही एक खुप आनंददायी घटना होय.
आणि हो माझ्या अवतीभवतीचा परिसर बारा लहान लहान खेड्यांनी घेरला आहे म्हणुन ह्या परिसराला बारुला म्हणतात. माझी दैनंदिन काळजी घेण्याची जवाबदारी आखातवाड्याच्याच लोकांना सामाजिक वनीकरण विभागाने दिली आहे.तेही मोठ्या आस्थेने ही जबाबदारी पार पाडतात. माझ्यासोबत त्यांचीही भेट घ्यायला नक्की या.
सरतेशेवटी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे माझी सहा नावे तुम्हाला सांगतो आणि तुमचा निरोप घेतो. तटाग, तडाग, कासार पुष्कर, सरस आणि निपान म्हणजेच तलाव.