अकोला, दि.2 अमरावती विभाग पदवीधर मतदार नोंदणी कार्यक्रम सुरु झाला असून क्षेत्रनिहाय सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा पदनिर्देशीत अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासकीय, निम शासकीय तसेच खाजगी आस्थापनांवरील पदवीधरअधिकारी कर्मचारी यांनी दि. ७ नोव्हेंबरपर्यंत आपली नोंदणी करावी, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी ऑनलाईन बैठकीत सर्व कार्यालय प्रमुखांना दिले आहेत.
निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात पदवीधर मतदार नोंदणी संदर्भात ऑनलाईन बैठक पार पडली. यावेळी निवडणूक विभागाचे मुकेश चव्हाण, पोलीस निरीक्षक नितीन शिंदे, ऑनलाईन बैठकीव्दारे, शिक्षणाधिकारी डॉ.सुचिता पाटेकर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे, उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे, रामेश्वर पुरी, सर्व तहसिलदार, विविध विभागाचे कार्यालय प्रमुख आदि उपस्थित होते.
कार्यालय प्रमुखांनी आपल्या आस्थापनांवरील पात्रताधारक पदवीधरांची मतदार नोंदणी प्राधान्याने करुन घ्यावी. नोंदणीकृत मतदारांची यादी कार्यालय प्रमुखांच्या मान्यतेने निवडणूक विभागाकडे सादर करावी. शिक्षण विभागाने शासकीय, निम शासकीय व खाजगी महाविद्यालयात पदवीधर नोंदणी मोहिम राबवावी. तसेच उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांनी त्यांच्या आस्थापनासह खाजगी आस्थापनावरील मतदारांचे नोंदणी झाली असल्याची खात्री करावी,असे निर्देश संजय खडसे यांनी दिले.