अकोला,दि.१ -: जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी नियतव्ययाधारीत व आवश्यकतांना प्राधान्य देऊन नियोजन करावे, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी सौरभ कटियार यांनी प्रशासनाला दिल्या.
जिल्हा परिषदेचे अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत (२०२२ -२३) जिल्हा शैक्षणिक गरजा समितीची बैठक झाली. राज्य शासनामार्फत राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये उत्साही व आनंदी शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी शाळांमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून अकोला जिल्ह्याच्या ७ तालुक्यातील १३६ शाळांमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्यासंदर्भात प्राप्त विषयांचा यावेळी आढावा घेण्यात आला. जिल्हा परिषद शाळांमध्ये नवीन वर्ग खोल्या बांधणे, वर्ग खोल्यांची दुरुस्ती,शाळांना कुंपण घालणे आदी विषयांनुसार गरजांच्या प्राधान्यक्रमानुसार ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ अशी वर्गवारी करून सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार यांनी दिले.
या बैठकीस जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथ) डॉ. वैशाली ठग, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी, पाणी पुरवठा विभागाचे तसेच बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता , सर्व गटशिक्षणाधिकारी आदी उपस्थित होते.