Morbi Bridge Collapse : मोरबी येथे मच्छू नदीवरील सुमारे १०० वर्षांहून अधिक वर्ष जुना असलेला झुलता पूल कोसळला आहे. रविवारी संध्याकाळी झालेल्या या दुर्घटनेत १३१हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश असून बचावकार्यासाठी पथके दाखल झाली आहेत. या दुर्घटनेत राजकोटचे भाजप खासदार यांच्या १२ नातेवाईकांचा मृत्यू झाला आहे. (Morbi Bridge Collapse)
मोरबीमधील हा झुलता पूल पर्यटकांचे आकर्षण असून, गेल्या दोन वर्षांपासून तो बंद होता. नूतनीकरणानंतर २५ ऑक्टोबरला हा पूल नागरिकांसाठी खुला करण्यात आला होता. रविवारी सुट्टी असल्याने या पुलावर मोठी गर्दी झाली होती. या पुलाची क्षमता शंभर जणांची असून, दुर्घटना घडली त्या वेळी पुलावर सुमारे पाचशे लोक होते. पूल कोसळल्याने हे लोक नदीत पडले. यावेळी भाजप खासदार मोहन भाई कुंडारिया यांचे १२ नातेवाईक त्यावेळी पुलावरच होते.
माजी केंद्रीय मंत्री व भाजपचे खासदार मोहन भाई कुंडारिया यांच्या १२ नातेवाईकांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. कुंडारिया यांच्या बहिणीच्या दिराच्या चार मुली आणि तीन जावई यांच्यासह पाच मुलांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच कुंडारिया रविवारपासून मोरबीयेथेच तळ ठोकून बसले आहेत.
या दुर्घटनेस जे कारणीभूत आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करणारच. दोषींना कठोर शिक्षा करणार, असं भाजप खासदार कुंडारिया यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधानांचा रोड शो रद्द
मोरबी पूल दुर्घटनेमुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद येथे होणारा रोड शो रद्द केला आहे. तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी मोरबीला भेट देऊ शकतात. पंतप्रधानांचे अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. या अपघाताबाबत पंतप्रधान मोदी सतत मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या संपर्कात आहेत. दुसरीकडे भाजपने आपले सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.