देशातील वाढत्या बेरोजगारीला केंद्र सरकारची धोरणे जबाबदार असल्याचा आरोप करीत विरोधकांकडून मोदी सरकारवर टिकास्त्र सोडले जाते. विरोधकांच्या याच टीकेला आता केंद्र सरकार हजारो युवकांना ‘नोकरी प्रमाणपत्र’ देवून प्रत्युत्तर देणार आहे. ऐन दिवाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील ७५ हजार युवकांना नोकरीचे ‘गिफ्ट’ देणार आहेत. शनिवारी (दि.२२) पंतप्रधान बेरोजगार युवकांना नोकरी प्रमाणपत्रांचे वितरण करणार आहेत.
शनिवारी ( दि. २२ ) व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी देशभरातील युवकांना संबोधित करीत बेरोजगार युवकांना नोकरी प्रमाणपत्रांचे वितरण करणार आहेत. या कार्यक्रमात देशातील वेगवेगळ्या शहरांमधून केंद्रीय मंत्री तसेच खासदार त्यांच्या लोकसभा मतदार संघातून हजर राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, ओडिशातून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, गुजरातमधून केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया तसेच केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर चंदीगड मधून कार्यक्रमात सहभागी होतील. जून महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व केंद्रीय विभाग तसेच केंद्रीय मंत्रालयांसोबत आढावा घेत दीड वर्षांमध्ये अर्थात डिसेंबर २०२३ पर्यंत १० लाख युवकांना नोकरी देणार असल्याचे जाहीर केले होते. पंतप्रधानांच्या घोषणेनंतर या दिशेने वेगाने काम सुरू करण्यात आले होते. याच अनुषंगाने आता पंतप्रधानांच्या हस्ते युवकांना नियुक्तीपत्र देण्यात येणार आहेत.