अकोला, दि.11 :- सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाव्दारे दारिद्रय रेषेखालील भूमिहीन अनुसूचित जाती व नवबौध्द शेतमजूरांकरीता पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना राबविण्यांत येते. या योजने अंतर्गत लाभार्थ्यास चार एकर कोरडवाहू किंवा दोन एकर बागायती शेतजमिन 100 टक्के अनुदानावर उपलब्ध करुन दिल्या जाते. या योजनेकरीता इच्छ़ुक लाभार्थ्यांनी शेतजमिन व्रिकीचे प्रस्ताव सर्व विहित कागदपत्रासह स्वत: समाजकल्याण कार्यालयात जमा करावे, असे आवाहन समाजकल्याण सहायक आयुक्त डॉ.अनिता राठोड यांनी केले.
दारिद्रय रेषेखालील भूमिहीन अनुसूचित जाती व नवबौध्द शेतमजूरांकरीता ही योजना असून या योजनेमुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होवून राहणीमानात सुधारणा व मजुरीवर असलेले अवलंबित्व कमी होणार आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरीता लाभार्थ्यांनी स्वत: कार्यालयात अर्ज करावा. कोणत्याही बाह्यव्यक्तीव्दारे योजनेचा लाभ घेवू नये. तसेच या कार्यालयामार्फत कोणत्याही बाह्यव्यक्तीशी नेमणूक केली नाही. शेतमालकाने किंवा लाभार्थ्यांनी परस्पर बाह्यव्यक्तीव्दारे योजनेबद्दल व्यवहार केल्यास व त्यात फसवणूक झाल्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही. तसेच योजनेअंतर्गत ज्या शेतजमीन मालकानी शेतविक्रीचे प्रस्ताव या कार्यालयास सादर केले असतील त्यांनी या कार्यालयाची परवानगी न घेता इतर व्यक्तीशी परस्पर शेतजमीन विक्रीबाबतचा व्यवहार केला असेल अशा शेतजमीन मालकाकडून शासनाची फसवणूक केल्याचे गृहित धरुन नियमानुसार फौजदारी कार्यवाही करण्यांत येईल. या योजनेची माहितीकरीता समाजकल्याण कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, निमवाडी, अकोला येथे संपर्क साधावा, असे आवाहन समाजकल्याण कार्यालयाव्दारे करण्यात येत आहे.