अकोला, दि :8 :- जिल्ह्याचा विकास करतांना तो समतोल असावा यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. सगळ्या भागांमध्ये सारखा विकास करण्याचा आमचा प्रयत्न असेल. निधी अभावी रखडलेल्या प्रकल्पांना चालना देऊ तथापि, प्रशासकीय दिरंगाई आणि कामांच्या गुणवत्तेतील चालढकल सहन केली जाणार नाही,असे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.
उपमुख्यमंत्री फडणवीस हे आज अकोला जिल्हा दौऱ्यावर आले होते. अकोल्याचे पालकमंत्री म्हणून त्यांचा हा प्रथम दौरा. त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. नियोजन भवनाच्या छत्रपती सभागृहात पार पडलेल्या या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभाताई भोजने, विधानपरिषद सदस्य आ. डॉ. रणजित पाटील, आ. किरण सरनाईक, आ. वसंत खंडेलवाल, विधानसभा सदस्य आ. गोवर्धन शर्मा, आ. प्रकाश भारसाकळे, आ. रणधीर सावरकर, आ. हरिष पिंपळे, आ. नितीन देशमुख, आ. आकाश फुंडकर तसेच विभागीय आयुक्त दिलीप पांढरपट्टे, अमरावती विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मिना, जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, मनपा आयुक्त कविता द्विवेदी, उपायुक्त नियोजन किरण जोशी, जिल्हा नियोजन अधिकारी गिरिश शास्त्री, सहायक नियोजन अधिकारी कैलास देशमुख तसेच सर्व यंत्रणाप्रमुख उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी मागील बैठकीच्या अनुपालन अहवालावर कामकाज झाले. या संदर्भात सर्व सदस्यांनी मांडलेले मुद्दे उपमुख्यमंत्र्यांनी ऐकून घेतले व त्यावर योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. श्री. फडणवीस यांनी स्पष्ट केले की, जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून होणाऱ्या सर्व कामांवर लावण्यात आलेली स्थगिती उठवण्यात आली असून लोकप्रतिनिधींनी आपल्या भागातील कामांचे प्रस्ताव पाठवावे.