अकोला, दि.7:- ( महाराष्ट्र ) नागरिकांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरुप देण्यासाठी राज्यातील उद्योजकता व नाविन्यपूर्ण परिसंस्था बळकट करण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत शुक्रवार दि.१४ रोजी महाराष्ट्र स्टार्ट अप आणि नाविन्यता यात्रा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अकोला येथे आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेत जिल्ह्यातील नवसंकल्पना राबवू पाहणाऱ्या युवक युवती उद्योजकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.
यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस जिल्हा कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त डी. एल. ठाकरे, जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक नयन सिन्हा, नाविन्यता परिषदेचे सभासद सागर पाटील, एम. आर राजपूत आदी उपस्थित होते. यावेळी या नाविन्यता यात्रा व संकल्पना सादरीकरणाच्या उपक्रमाबाबत माहिती सादर करण्यात आली. दि.१४ रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलांची), महसूल कॉलनी, बस स्टॅण्ड मागे, अकोला आयोजित या प्रशिक्षण शिबिर व सादरीकरण कार्यक्रमात नवउद्योजकांना स्थानिक उद्योजक व तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच नोंदणी केलेल्या नव उद्योजकांच्या संकल्पनांचे तज्ज्ञांसमोर सादरीकरण होणार आहे. तरी नाविन्यपूर्ण संकल्पना असलेल्या नागरिकांनी www.msins.in या संकेतस्थळावर आपल्या नव कल्पना नोंदवाव्या. यासंदर्भात अधिक माहिती व शंका निरसनासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अकोला या कार्यालयास शासकीय कामकाजाच्या दिवशी भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.