अकोला, दि.१ :- पृथ्वीवर मानव व वन्यप्राणी तसेच वनस्पती यांचे सहचर्य असून हे सहचर्य हेच या पृथ्वीच्या सौंदर्याचे गमक आहे. त्यासाठी आपण प्रत्येक पृथ्वीवरील रहिवाशाने वन्यजीव संवर्धनाचा संकल्प करावा, असे आवाहन आदिवासी विकास विभाग अमरावतीचे अपर आयुक्त सुरेश वानखेडे यांनी केले.
येथील शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयाच्या पद्मानंद सभागृहात आज वन्यजीव सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष गोपाल खंडेलवाल हे होते. यावेळी अमरावती विभागाचे आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त सुरेश वानखेडे, अकोला उपवनसंरक्षक (वन्यजीव) ए.डब्ल्यू. निमजे, सहा. वनसंरक्षक सुरेश वडोदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जगदीश साबू, आदिवासी विकास विभाग अकोलाचे प्रकल्प संचालक आर.बी. हिवाळे, प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रिया खिल्लारे, निसर्ग कट्टा या संस्थेचे अमोल सावंत आदी उपस्थित होते. वन्यजीव छायाचित्र प्रदर्शन, विद्यार्थ्यांनी सादर केलेली नाटीका, वाघोबाच्या पत्राचे वाचन यावेळी सादर करण्यात आले.
आपल्या संबोधनात वानखेडे म्हणाले की, वन्यजीवांचे प्रत्यक्ष वनातील दर्शन ही एक रोमांचकारी अनुभूती असते. वन्यजीवांच्या साखळीमुळे वनांचे, पर्यावरणाचे रक्षण होऊन परिणामी मानवी जीवन सुखद व संपन्न होते. त्यासाठी वन्यजीवांचे अस्तित्व, त्यांचे सहचर्य याबाबी विद्यार्थी दशेपासूनच मनावर बिंबवायला हव्या,असे त्यांनी सुचविले.
प्रास्ताविक सुरेश वडोदे यांनी केले. तसेच ए.डब्ल्यू. निमजे यांनी या सप्ताहात आयोजीत विविध उपक्रमांची माहिती दिली. प्राचार्य डॉ. साबू यांनीही यावेळी वन्यजीवांचे महत्त्व सांगून अशा उपक्रमाचे आयोजन व्हावे, अशी भुमिका मांडली. सुचेता विंचणकर यांनी नाटीका सादरीकरण व वाघोबाच्या पत्राचे वाचन केले.आभार प्रदर्शन मिलिंद शिरभाते यांनी केले तर डॉ. निशा वराडे यांनी सूत्रसंचालन केले.
सप्ताह भर विविध कार्यक्रमः-
दि. १ ते ७ ऑक्टोबर या कालावधीत वन्यजीव सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात-
रविवार दि.२ रोजी अकोला ते काटेपूर्णा अभयारण्य सायकल रॅली व जलाशय स्वच्छता मोहिम, विविध रोपवाटीकांमध्ये स्वच्छता मोहिम, सकाळी ९ ते १० या वेळात नेहरू पार्क अकोला येथे ‘माझा आवडता वन्यप्राणी’, या विषयावर चित्रकला व रंगभरण स्पर्धा,
सोमवार दि.३ रोजी सकाळी साडेनऊ वा. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील शेतकरी सदन येथे वनअधिकाऱ्यांसाठी सोशल मिडिया हाताळणी, जैवविविधता ओळख, परिचय व ताणतणाव नियंत्रण व व्यवस्थापन याविषयी कार्यशाळा,. अकोला शहरातील विविध विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी वन्यजीवांचे परिचय करुन देणारे फिल्म शो, श्रीमती राधादेवी गोएंका महाविद्यालय व श्री शिवाजी महाविद्यालयात वन की बातः विद्यार्थ्यांशी संवाद,
मंगळवार दि.४ रोजी सकाळी ९ वा. बस स्टॅण्ड व गांधी रोड अकोला येथे नाटीका सादरीकरण, माळराजूरा येथे दिवसभर वन्यजीव बचाव पथकाचे प्रशिक्षण व सर्पज्ञान, सुधाकर नाईक सभागृह अकोला येथे निसर्ग मित्रांचा पुरस्कार सोहळा, विभागातील सर्व वनपरिक्षेत्रस्तरावर वनसंरक्षण समिती सभा, गुलामनबी आझाद महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र व वनस्पतीशास्त्र विभागातर्फे वन की बात.
गुरुवार दि.६रोजी कापशी तलाव, काटेपूर्णा अभयारण्य जलाशय, आखतवाडा जलाशय, चोंढी तलाव येथे पक्षीनिरीक्षण व गणना,
शुक्रवार दि.७ रोजी आर.एल.टी. कॉलेज येथे पारितोषिक वितरण व समारोप सोहळा.