Lumpy Skin Diseases: देशात लंपी संसर्गाने भयावह रुप धारण केले आहे. १५ राज्यातील २५१ जिल्ह्यांमध्ये संसर्गाने पाय पसरले असून, २०.५६ लाखांहून अधिक गोवंशांना हा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. या संसर्गामुळे आतापर्यंत ९७ हजारांहून अधिक गोवंशांचा मृत्यू झाला आहे. राजस्थानमध्ये सर्वाधिक १३.९९ लाखांहून अधिक गायींना हा संसर्ग झाला असून, यातील ६४ हजारांहून अधिक गोवंशांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या संसर्गाचा थेट प्रभाव शेतकऱ्यांवर पडला आहे.
‘गोटपॉक्स’ लस या संसर्गावर गुणकारी
देशातील तब्बल ३.६० कोटी गोवंशांना अतिसंवेदनशील श्रेणीत नोंद घेण्यात आली आहे. २३ सप्टेंबरपर्यंत ९७ हजार ४३५ गोवंशाचा मृत्यू झाला आहे. या संसर्गापासून जनावरांचा बचाव करण्यासाठी लसीकरण अभियानाला वेग देण्यात आला आहे. २०१९ पासून लंपी संसर्गााचे प्रकरणे समोर येत आहेत. बकऱ्यांना देण्यात येणारी ‘गोटपॉक्स’ लस लंपी (Lumpy) संसर्गाविरोधात गुणकारक असल्याने, राज्यांना १३८ लाख ५८ हजार लसी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. १.४७ कोटी लसींचे डोस अद्याप उपलब्ध असून, ऑक्टोबर महिन्यात ४ कोटी डोस पाठवण्यात येतील, अशी माहिती केंद्राकडून देण्यात आली आहे.
लंपी-प्रो वॅक-इंड’ कृषी मंत्रालयातर्फे लॉन्च; लवकरच होणार बाजारात उपलब्ध
हरियाणातील राष्ट्रीय अश्व संशोधन केंद्राने भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था, इज्जतनगर यांच्या सहकार्याने लंपीवरील स्वदेशी लस विकसित केली आहे. लंपी-प्रो वॅक-इंड नावाच्या या लसीला केंद्रीय कृषी मंत्र्यांनी लॉन्च केले होते. लवकरच ही लस बाजारात उपलब्ध होईल. या लसीच्या उत्पादनाची जबाबदारी बायोवॅट कंपनीला देण्यात आली आहे. लंपी संसर्गावरील उपचारासाठी ‘रिंग व्हॅक्सिनेशन’ फायदेशीर ठरत आहे. यानुसार लंपी संसर्गग्रस्त गोवंश असलेल्या गावाच्या ५ किलोमीटर वरील सर्व गोवंशाचे लसीकरण केले जात आहे. संसर्गातील सरासरी मृत्यूदर जवळपास ५% आहे. काही ठिकाणी हा दर १०% असल्याची माहिती समोर आली आहे. संसर्गाच्या लक्षणांच्या आधारे योग्य उपचार केल्यास, तो ९० ते ९५% बरा होवू शकतो, असे केंद्राकडून सांगण्यात आले आहे.