अकोला, दि.24: शेतकऱ्यांना दर्जेदार प्रमाणित बियाणे अनुदानीत दरावर उपलब्ध व्हावा तसेच कडधान्य व तृणधान्य पिकांच्या नवीन वाणाचा प्रचार प्रसार व्हावा याकरीता राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातंर्गत अनुदानीत दराने बियाणे उपलब्ध करून देण्यात येत आहे. याकरीता पिक प्रात्यक्षिक अंतर्गत हरभरा, रब्बी ज्वारी, करडई पिकाकरीता सर्वसाधारण, अनु जाती, अनु जमाती प्रवर्गातील अत्यल्प, अल्प भूधारकांनी महाडीबीटीवर अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शहा यांनी केले आहे.
शेतकऱ्यांना दर्जेदार प्रमाणित बियाणे अनुदानीत दरावर उपलब्ध व्हावे व कडधान्य, तृणधान्य पिकांच्या नवीन वाणाचा (१० वर्षा आतील व १० वर्षा वरिल) प्रसार व्हावा व शेतकऱ्यांना अवलंब करण्यास प्रोत्साहन मिळावे याकरीता राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातंर्गत हरभरा पिकांच्या 10 वर्षा आतील वाणास 25 रुपये प्रति किलो प्रमाणे तसेच रब्बी ज्वारी पिकाच्या 10 वर्षा वरील वाणास 15 रुपये प्रती किलो अनुदानीत दराने बियाणे उपलब्ध करून देण्यात येत आहे. महाबीज अकोला, कृभको अकोला,राबिनी अमरावती, के.व्ही.के.अकोला मार्फत त्यांच्या अधिकृत वितरकांद्वारे तालुका निहाय हरभरा व ज्वारी पिकाचे प्रमाणित बियाणे वितरण करण्यात येत आहे. अनुदानीत दराने उपलब्ध प्रमाणित बियानेचा लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांनी बियाणे पुरवठादार संस्थांच्या अधिकृत वितरकांकडे अनुदान वजा जाता दराने प्रमाणित बियाणे खरेदी करायचे आहे.
या योजनेत पिक प्रात्यक्षिक अंतर्गत हरभरा, रब्बी ज्वारी,करडई पिकाकरीता सर्वसाधारण,अनु जाती,अनु जमाती प्रवर्गातील अत्यल्प किंवा अल्प भूधारकांनी (अपंग,महिला,माजी सैनिक आत्महत्याग्रस्त कुटुंब) महाडीबीटीवर अर्ज केल्यानंतर एका गावातील लॉटरी मध्ये निवड झालेल्या 25 शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदानावर पिक प्रात्यक्षिकाचा लाभ मिळू शकेल. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हरभरा, रब्बी ज्वारी व करडई पिकाच्या अनुदानीत दराने लाभ घेण्यासाठी महाडीबीटीवर अर्ज करावा. अधिक माहितीसाठी मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी व कृषि विभागाच्या नजीकच्या कार्यालयाशी तसेच महाबीज अकोला येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आरीफ शहा यांनी केले आहे.