अकोला, दि. 23 राष्ट्रीय जंतनाशक दिना (दि. 10 ऑक्टोंबर) निमित्त आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यात वय वर्षे एक ते 19 या वयोगटातील लाभार्थ्यांना (बालक व किशोरवयीन मुला मुली) जंतू नाशक गोळ्या देण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील मनपा क्षेत्रातील 1 लाख 13 हजार 600 बालकांना तर अंगणवाडी, शाळांमध्ये नोंद असलेले व नसलेले विद्यार्थी, बालके मिळून 3 लाख 33 हजार 414 असे एकूण 4 लाख 47 हजार 14 बालकांना जंतनाशक गोळी देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.
या मोहिमेसाठी सर्वस्तरावरील यंत्रणा व आरोग्य कर्मचाऱ्यांनी सतर्क राहून सर्व बालकांपर्यंत जंतनाशक गोळी पोहोचवून त्यास ती खाऊ घालावी. तसेच शाळा व महाविद्यालयांनी या मोहिमेकरीता सहकार्य करुन विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळा द्याव्या, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिले.
यासंदर्भात आज निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात जंतनाशक मोहिमची बैठक पार पडली. यावेळी माता बाल संगोपन अधिकारी डॉ. विनोद करंजीकर, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अस्मिता पाठक, जिल्हा परिषदचे नंदा गिरी, निक्षी कुकर, प्राथमिक शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी साजीया नौसर, जिल्हा रुग्णालयाचे के.व्ही जामुळकर आदी उपस्थित होते.
यावेळी माहिती देण्यात आली की, जिल्ह्यात ही मोहिम 1160 आशा सेविका, 1404 अंगणवाडी केंद्र, 1080 शाळा, 326 खाजगी शाळा 13 तांत्रिक शिक्षण संस्था यांच्यामार्फत राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत अंगणवाड्यांमध्ये नोंद असलेल्या 88 हजार 479 बालकांसह शाळांमधील विद्यार्थी व नोंद नसलेले बालके मिळून 2 लाख 44 हजार 935 बालकांना तर मनपा क्षेत्रातील 1 लाख 13 हजार 600 जंतनाशक गोळी देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त वय वर्षे एक ते 19 या वयोगटातील बालकांना व किशोरवयीन मुला मुलींना अंगणवाडी, शाळा तसेच केंद्रस्तरावर जंतनाशक गोळी देऊन त्यांच्या आरोग्याचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न होईल. ही मोहिम राष्ट्रीय जंतनाशक दिन 10 ऑक्टोबर रोजी राबविण्यात येईल. तर ज्या बालकांना जंतनाशक गोळा राहिले अशाना दि. 17 ऑक्टोंबर रेाजी देण्यात येईल. या मोहिमेत सार्वजनिक आरोग्य विभाग, महिला व बालविकास विभाग, शिक्षण विभाग, आदिवासी विभाग यांचा समावेश आहे.
अशी दिली जाणार गोळी
या मोहिमेत Albendazole 400 mg ही गोळी चावून खाण्यास देण्यात येईल. त्यातही एक ते दोन वर्षे वय असलेल्या बालकास अर्धी गोळी (200 मि. ग्रॅ.) पावडर करुन पाण्यात विरघळून, तर दोन ते तीन वर्षे वयाच्या बालकास अर्धी गोळी (400 मि. ग्रॅ.) पावडर करुन पाण्यात विरघळून देण्यात येईल. तसेच तीन ते 19 वयोगटापर्यंत एक गोळी (400 मि. ग्रॅ.) चावून खाण्यास देण्यात येईल. गोळी घेतांना बालकाने नाश्ता अथवा जेवण केलेले असणे आवश्यक आहे. लाभार्थी संख्येनुसार आवश्यक गोळ्यांचा साठा सर्व केंद्रस्तरावर पोहोचविण्यात आला आहे. आरोग्य कर्मचारी व आशा सेविका यांचे प्रशिक्षण झाले असून शिक्षकांनाही याबाबत सचेत करण्यात आले आहे,अशीही माहिती यावेळी देण्यात आली.