अकोला,दि.15: लम्पि चर्म रोग हा संसर्गजन्य आजार असून तो ‘गो’ वर्गातील जनावरांचा त्वचा रोग आहे. लम्पि चर्म रोग हा जनावरांपासून माणसामध्ये संक्रमित होत नसल्याने मानवी आरोग्याला कोणताही धोका नाही. तसेच बाधीत गायीचे दुध देखील सुरक्षित असून त्याबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले असून अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. तसेच जिल्ह्यात पशुंचे लसीकरण वेगाने सुरु असून 1 लक्ष 65 हजार 200 लस मात्रांचे वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जगदीश बुकतरे यांनी दिली आहे.
या संदर्भात पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, लंपी चर्म रोग हा रोग बहुतांश गो वर्गातील जनावरांना होणारा विषाणुजन्य त्वचा रोग आहे. या आजारासाठी कारणीभूत असणारे विषाणू देवी विषाणू गटातील कॅप्री पौक्स या प्रवर्गात मोडतात. त्याचा प्रादुर्भाव सर्व वयाच्या पशूंना होत असून लहान वयाच्या पशूंना रोगाची लागण होण्याची शक्यता जास्त असते. लम्पि आजार हा जनावरांपासून माणसामध्ये संक्रमित होत नाही. त्यामुळे मानवी आरोग्याला कोणताही धोका नाही. तसेच बाधीत जनावरांच्या दुधामुळे या आजाराचा संसर्ग होत नाही, असे पशुसंवर्धन विभागाने स्पष्ट केले आहे. दुध उकळून घेतल्यावर लम्पि आजाराचा विषाणू उच्च तापमानाला जिवंत राहत नाही. त्यामुळे या दुधापासून मानवाला कोणताही धोका नाही. या आजाराबाबत सामाजिक माध्यमाद्वारे चुकीची माहिती पसरविल्या जात असून अशा अफवावर विश्वासू ठेवू नये. असे कृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे पशुसंर्वधन विभागाने कळविले आहे.
उपचार व लसीकरण वेगात
बाधीत जनावरांसाठी पशुसंवर्धन विभाग अहोरात्र कार्यरत असून सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत लम्पि बाधीत जनावरांचे उपचार व लसीकरण करण्यात येत आहे. बाधीत क्षेत्रात 10 पशुधन विकास अधिकारी व 11 पशुधन पर्यवेक्षक यांच्या नियुक्त्या करण्यात आले आहे. तसेच त्यांची क्षेत्रीय स्तरावरील बाधित पशुधनाचा उपचार, अबाधीतांचे लसीकरण, अनुषंगिक बाबीचा पाठपुरावा, भेटी देणे इत्यादी उपाययोजना राबविण्यात आले आहे.
जिल्ह्यात 1 लक्ष 65 हजार 200 लस मात्रांचे वाटप
पशुसंवर्धन विभागामार्फत 1 लक्ष 65 हजार 200 लसीच्या मात्रा अकोला जिल्ह्याकरिता वाटप करण्यात आल्या आहेत. तसेच लंपी आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत जनजागृती केली जात आहे. सद्यस्थितीत अकोला जिल्ह्यामध्ये 57 इपिसेंटर असून 834 बाधित जनावरांपैकी 355 जनावरे बरी झाली आहेत. तर 472 सक्रिय पशूरुग्ण आहेत. उपाचाराकरीता एकूण 57 गावांच्या पाच किमी परिघामध्ये एकूण 58 हजार 28 जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. लम्पि चर्म रोगाचा पशुरुग्ण आढळल्यास त्वरीत नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जगदीश बुकतरे यांनी केले आहे.