मुंबई : मंत्रालयामधील अधिकाऱ्यांसोबत वाद घातल्याच्या प्रकरणात गिरगाव न्यायालयाने प्रहार संघटनेचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर पोलिसांनी बच्चू कडू यांना ताब्यात घेत वैद्यकीय चाचणीसाठी सर जे. जे रुग्णालयात नेले आहे.
सामान्य प्रशासन विभागातील उपसचिव भाऊराव गावित यांना अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप अधिकाऱ्यांच्या संघटनेने केला होता. याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणात बच्चू कडू हे बुधवारी गिरगांव न्यायालयासमोर हजर झाले. त्यानंतर न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
दरम्यान, बच्चू कडू यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर गिरगाव न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर न करता जामीनाची केस सत्र न्यायालयात हस्तांतरीत केली आहे. त्यामुळे आता बच्चू कडू याना सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज सादर करावा लागणार असून सत्र न्यायालयाकडून त्यांना जामीन मिळू शकतो.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सामान्य प्रशासन विभागातील उपसचिव भाऊराव गावित यांना अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी ३० मार्च २०१६ रोजी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप अधिकाऱ्यांच्या संघटनेने केला होता. या घटनेचे तीव्र पडसाद उमटत मंत्रालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी येथे ठिय्या आंदोलनही केले होते.
बेकायदा काम करून घेण्यासाठी कडू हे गावित यांच्यावर दबाव आणत होते, असा आरोप महाराष्ट्र मंत्रालयीन अधिकारी संघटनेने करत कडू यांच्यावर कारवाई होईपर्यंत मंत्रालयात काम बंद आंदोलन सुरूच राहील, असा इशारा दिला होता. संघटनांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे अखेर कडू यांच्या विरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.