अकोला, दि.८:- लम्पि चर्मरोग या जनावरांमधील आजाराचा फैलाव रोखण्यात पशुसंवर्धन विभागाला यश आले आहे असे प्रथमदर्शनी वाटत असले तरी शासन सतर्क असून जनावरांचे लसीकरण करण्यास शासन प्राधान्य देत आहे, अशी माहिती राज्याचे महसूल, दुग्ध व्यवसाय व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
येथील आढावा बैठकीनंतर ना. विखे पाटील यांनी पत्रकारांना माहिती दिली. यावेळी त्यांचे समवेत विधानसभा सदस्य आ. प्रकाश भारसाकळे, आ. हरिष पिंपळे, पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह, जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार आदी उपस्थित होते.
राज्यात या आजाराचा शिरकाव हा गुजरात व राजस्थान या राज्यातून झाला. या आजारात मृत्यूचे प्रमाण अत्यल्प असले तरी लसीकरण करण्यास प्राधान्य दिले जात आहे. सद्यस्थितीत राज्यातील १७ जिल्हे प्रादुर्भावग्रस्त आहेत. संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून जनावरांचे बाजार बंद करण्यात आले आहेत. आंतरराज्यीय, आंतर जिल्हा, आंतर तालुकास्तरावर जनावरांची ने आण बंद करण्यात आली आहे, अशी माहिती ना. विखे पाटील यांनी दिली.
राज्यात पशुवैद्यकांची रिक्त पदे भरण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. तथापि तातडीची स्थिती पाहता खाजगी पशुवैद्यकांची लसीकरणासाठी मदत घ्यावी, अशा सुचना देण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. राज्यातील पशुविज्ञान विद्यापीठे व त्यांच्या प्रयोगशाळा यांनी शासकीय प्रयोगशाळांशी समन्वय राखावा. लसीकरण व उपचारासाठी सर्व तज्ज्ञ डॉक्टर्सने बाहेर पडावे,असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या आजारात जनावरे दगावण्याचे प्रमाण नगण्य असले तरी जनावर दगावल्यास पशुपालकास मदत देण्याबाबतची बाब मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपण मांडू,असे आश्वासनही त्यांनी दिले.