याकूब मेमनच्या कबरीची सजावट केल्याने सध्या मोठा वाद उफाळून आला आहे. मुंबई पोलिसांनी तात्काळ कारवाई केली असून आता या कबरीवरुन एलईडी लाईट्स हटवण्यात आले आहेत. मात्र आता या प्रकरणाला राजकीय रंग लागण्यास सुरुवात झाली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणी प्रतिक्रियाही दिली आहे.
२१ वर्षांपासून शिवसेनेच्या आयटीसेलचं काम पाहणारे रमेश सोळंकी यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात बावनकुळे बोलत होते. यावेळी त्यांनी याकुब मेमन कबर सजावटप्रकरणी मागच्या ठाकरे सरकारचा निषेध केला आहे. तसंच अशा घटना पुन्हा होऊ नयेत, याची काळजी सरकारने घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. देशद्रोही याकुब मेमनच्या कबरीचं कोरोना काळात सौंदर्यीकरण झालं. त्यावेळी उद्धव ठाकरेंना भेटायला वेळ नव्हता, अशावेळी त्यांनी याकुब मेमनच्या कबरीला अलिखित परवानगी दिली. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी आपलं हिंदुत्व किती बदललं हे यावरुन स्पष्ट होत आहे. ज्यांनी हा देशद्रोही गुन्हा केला त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मी मागणी करत आहे. भाजप सरकारला विनंती करत आहे की सरकारने तातडीने मविआने याला समर्थन केलं ते आणि ज्याने सुशोभिकरण केलं त्यांना तातडीने शोधून काढावे. हे गंभीर प्रकरण आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की आम्ही कट्टर हिंदुत्ववादी आहोत, आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व सोडणार नाही आणि मग हे केलं. या प्रकरणाचा शोध लागला पाहिजे. उद्धव ठाकरेंनी हे कॉम्प्रमाईज का केलं याचं उत्तर द्यायला हवं. तेव्हाच्या गृहमंत्र्यांनी काय केलं? राज्याचे मुख्यमंत्री का गप्प बसले, त्यांना खुर्ची टिकवण्यासाठी हे करावं लागलं का, असे सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत. सरकार कारवाई करेल पण ही घटना उद्धव ठाकरे यांच्या काळात घडली त्यामुळे यात दोषी असणाऱ्या सर्वांवर कारवाई व्हावी, अशी अपेक्षाही बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे.