अकोला,दि.5: निदान न झालेले कुष्ठरुग्णांचा तसेच नविन सांसर्गिक कुष्ठरुग्ण शोधून बहुविधी औषधोपचाराव्दारे संसर्गाची साखळी खंडीत करुन संसर्गाचा आटोक्यात आणण्याचे निर्देश अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी संबंधिताना दिले.
अपर जिल्हाधिकारी यांच्या दालनात कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोध मोहिम समन्वय समिती आढावा बैठकीचे आयोजन अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. मनिष शर्मा, जिल्हा मलेरीया अधिकारी डॉ. आदित्य महानकर, मनपाचे सहा.क्षयरोग अधिकारी डॉ. अस्मिता पाठक, आरोग्य सेवा कुष्ठरोग सहायक संचालक डॉ. संदीप बाबर आदि संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा समन्वय समिती सभेमध्ये अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी निर्देश दिले की, जिल्ह्यातील कुष्ठरोग व क्षयरोग रुग्णांचा शोध घेण्याकरीता 13 ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीत शोध मोहिम कार्यक्रम यशस्वी व प्रभावीपणे राबवा. या करीता जिल्हा व ग्रामस्तरावरील आशा व पुरुष स्वयंसेवक व विविध स्तरावरील पर्यवेक्षकांना प्रशिक्षीत करा. प्रशिक्षीत पथकाव्दारे गृहभेटी दरम्यान कुष्ठरुग्ण व क्षयरुग्णाबाबतची माहिती देऊन संशयीत रुग्णांची वेळेत तपासण्या करुन उपचार करण्याबाबत प्रोत्साहित करा. उपचाराने हा रोग बरा होतो याची खात्री करुन द्या. रुग्णांची माहिती गोपनीय राहिल यांची दक्षता संबंधितांनी घ्यावी. या शोध मोहिमेतून कुष्ठरोग व क्षयरोग रुग्ण सुटता कामा नये. याकरीता करीता सुक्ष्मकृती आराखड्यानुसार अभियानाचे नियोजन करा, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी यावेळी दिले.
यावेळी माहिती देण्यात आली की, जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील 2 लक्ष 76 हजार 659 घरांना भेटी देवून शहरी व ग्रामिण भागातील एकूण 13 लक्ष 83 हजार 294 लोकांच्या सर्व्हेव्दारे कुष्ठरोग व क्षयरोग रुग्णांचा शोध घेण्यात येईल. त्यासाठी 1042 चमू तयार करण्यात आले आहेत. हे चमू दि. 13 ते 30 सप्टेंबर या कालावधीत घरोघरी भेट देणार आहेत. या सर्वेक्षणाचे काम आशा सेविका व पुरुष स्वंयसेवक करणार आहे. या कालावधीत दररोज एका चमुमार्फत त्यांना नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रातील ग्रामीण भागात 20 घरे व शहरी भागात 25 घरांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. घरातील सर्व सदस्यांची तपासणी करुन घराच्या दरवाजावर खूण करण्यात येणार आहे. क्षयरोग रोगाची लक्षणे आढळल्यास रुग्णांच्या थुंकीचे एक तासाच्या अंतराने दोन नमूने घेण्यात येतील. आवश्यकता वाटल्यास छातीचा एक्स-रे काढण्यात येईल. तसेच कुष्ठरोगाची लक्षणे आढळल्यास त्यांची प्राथमिक तपासणी करण्यात येईल. यासाठी सर्व नियोजन करण्यात आले असल्याची माहिती सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ. संदीप बाबर यांनी दिली. या मोहिमेबाबत पथनाट्य, पोस्टर्स, बॅनर्स व ध्वनीक्षेपकाव्दारे जनजागृती करण्यात येणार आहे.