अकोला दि.3 : जिल्ह्यामध्ये लम्पी चर्मरोग या रोगाचा प्रादुर्भाव जनावरांमध्ये आढळून आला आहे. या रोगाचा प्रसार जिल्ह्यातील इतर ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे संसर्ग केंद्रापासून १० किलोमीटर बाधीत क्षेत्र नियंत्रित क्षेत्र घोषित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहेत.
अकोला तालुक्यातील पैलपाडा, अकोट तालुक्यातील उमरा, बेलूरा, मकरमपूर, जितापूर, लाडेगाव, रामापूर, शहापूर, रूपागड, जळगाव नहाटे, सुकळी, अकोट, मुर्तिजापूर तालुक्यातील सिरसो, शेरवाडी, बार्शिटाकळी तालुक्यातील धाबा, लोहगड (तांडा), बाळापूर येथील व्याळा, कोळसा, पातूर तालुक्यातील बोडखा, आगीखेड या गावांना नियंत्रीत क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आले आहे. या गावांमध्ये खालीलप्रमाणे उपाययोजना करण्याचे आदेशात नमूद केले आहे.
गुरे, म्हशी प्रजातींचे प्राणी उक्त नियंत्रीत क्षेत्राबाहेर नेण्या-आणण्यास मनाई. प्राण्यांच्या संपर्कात आलेली कोणत्याही प्रकारची वैरण किंवा अन्य साहित्य आणि अशा प्राण्यांच्या शवावरील कातडी किंवा इतर कोणताही अवयव किंवा प्राण्यांपासूनचे अन्य कोणतेही उत्पादन नियंत्रीत क्षेत्रामधून बाहेर नेण्यास मनाई. प्राण्यांचा कोणताही बाजार भरवणे, शर्यती लावणे, जत्रा भरवणे, प्रदर्शन आयोजित करणे गट करून किंवा त्यांना एकत्रीत करून अन्य कोणतेही काम पार पाडणे यास मनाई.जनावरांवर तसेच जनावरांचे गोठे व लगतच्या परिसरामध्ये बाह्य किटकांच्या निर्मूलनासाठी औषधांची फवारणी संबंधीत ग्रामपंचायत, नगरपंचायत यांनी करावी.बाधित परिसरात स्वच्छता तसेच निर्जंतूक द्रावणाची फवारणी संबंधीत ग्रामपंचायत यांनी करावी. रोग प्रादुर्भावामुळे पशु मृत झाल्यास त्यांची पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखालील शास्त्रोत पध्दतीने विल्हेवाट लावण्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत ग्रामपंचायत, नगरपंचायत यांची राहील. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार प्रादुर्भावग्रस्त भागापासून ५ किलोमीटरच्या त्रिजेमध्ये येणाऱ्या गावातील गो व महिषवर्गीय पशुंना गोट पॉक्स वॅक्सिन -उत्तरकाशी स्ट्रेन चा वापर करून प्रतिबंधात्मक लसीकरण तात्काळ करण्यात यावे. बाधित जनावरांवर औषधोपचार करण्यासाठी वापरात आणलेल्या सिरींजेस, निडल्स इ. तात्काळ नष्ट करण्यात याव्या. बाधित भागात तात्काळ शीघ्र कृती दले (रॅपीड रिसपॉन्स टीम्स) चे गठन करावे, असे निर्देश या आदेशात देण्यात आले आहेत.