अकोला,दि. 25: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जिल्ह्यामध्ये 2 लक्ष 29 हजार 764 शेतकरी लाभार्थ्यांची नोंदणी झाली असून अद्यापही 81 हजार शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रक्रिया होणे बाकी आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरीता शेतकऱ्यांनी जवळच्या सेवा केंद्रावर किंवा सेतू केंद्रावर आधार कार्ड नोंदणी करुन ई-केवायसी प्रक्रिया पुर्ण करावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्हा सूचना अधिकारी अनिल चिंचोले, सर्व तालुका समन्वयक उपस्थित होते.
निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी निर्देश दिले की, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसंबधीत लाभार्थ्यांची माहिती भूमी अभिलेख दस्तावेजानुसार अचूक भरावी. तलाठी यांनी आपल्या क्षेत्रातील भरावयाची माहिती मुदतीत भरुन घ्यावी. त्याबाबतचा अहवाल सादर करावा. योजनेसंबधीत माहिती बुधवार दि. 31 ऑगस्टपुर्वी पुर्ण करायची आहे. तसेच दुय्यम नोंदणी व मयत लाभार्थ्यांच्या नोंदण्या रद्द करुन प्रलंबित प्रकरणे तातडीने मार्गी लावावे, असे निर्देश खडसे यांनी दिले. ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया होणे बाकी आहे अशा शेतकऱ्यांनी जवळच्या सेवा केंद्रावर किंवा सेतू केंद्रावर आधार कार्ड नोंदणी करुन ई-केवायसी प्रक्रिया पुर्ण करावी, असे आवाहन खडसे यांनी यावेळी केले.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी तीन टप्यामध्ये प्रत्येकी दोन हजार प्रमाणे सहा हजार रुपये आर्थिक सहाय त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येतात. या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने जवळच्या सेवा केंद्र किंवा सेतू केंद्रावर आधार कार्ड नोंदणी करुन ई-केवायसी प्रक्रिया पुर्ण करावी. याबाबत पी.एम.किसान पोर्टलवर ई-केवायसी टॅबवर क्लिक करुन आधार क्रमांक टाकून नोंदणी करता येते.ही प्रक्रिया सोप्या पद्धतीने व कमी वेळात होते. तरी शेतकरी लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्याकरीता ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन अतिरिक्त सूचना वैज्ञानिक अधिकारी अनिल चिंचाले यांनी केले.