अकोला दि.20 अर्थ व सांख्यिकी संचालनालय प्रादेशिक कार्यालयामार्फत विभागातील सर्व जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय नमुना पाहणी 79 व्या फेरीच्या सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. हे सर्वेक्षण जून 2023 पर्यंत करण्यात येणार आहे. या सर्वक्षणाकरीता आलेल्या कर्मचाऱ्याला माहिती देऊन शासनाच्या उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपसंचालक प्रफुल्ल पांडे यांनी केले आहे.
राष्ट्रीय नमुना पाहणी फेरीमध्ये व्यापक वार्षिक मॉडयुलर सर्वेक्षण व आयुष या दोन विषयावर माहिती संकलित करण्यात येत आहे. या पाहणीमध्ये शाश्वत विकास ध्येय, निर्देशांक तयार करण्याच्या उद्देशाने प्राथमिक माहिती गोळा केली जात आहे. तसेच विविध सामाजिक, आर्थिक परिणामांमध्ये देशाच्या कामगिरीचे मोजमाप करण्यासाठी व जागतिक स्तरावर तुलना करण्यासाठी या निर्देशांकांची माहिती संकलित केली जात आहे.
सर्वेक्षणादरम्यान औपचारिक व अनौपचारिक शिक्षण, प्रशिक्षणामध्ये तरूणांचा सहभागाचा दर, इंटरनेटचा वापर, मोबाईल फोन वापरणाऱ्यांची संख्या, संगणक वापराबाबतची माहिती, सुरक्षित पिण्याच्या पाण्याच्या सुविधा,इंटरनेट सुविधा वापरणाऱ्य व्यक्तीची टक्केवारी, वित्तीय संस्थेत खाते असलेल्या महिलांची टक्केवारी, लोकसंख्येचे प्रमाण, स्वच्छता सेवा, वीज वापराबाबतचे प्रमाण इत्यादी अनेक बाबींवर माहिती गोळा करण्यात येत आहे.
आयुषअंतर्गत जनतेमध्ये असलेली जागरुकता तपासण्यात येणार असून आयुष उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या लोकसंख्येची टक्केवारी व त्याबाबतचा येणारा खर्चाबाबत माहिती गोळा केली जात आहे. शासनाच्या उपक्रमात जनतेनी सहभागी होऊन सहकार्य करावे व सांख्यिकी कार्यालयामार्फत आलेल्या कर्मचाऱ्याला माहिती देऊन शासनाच्या या उपक्रमात सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन अर्थ व सांख्यिकी संचालनालय प्रादेशिक कार्यालयाचे प्र. सहसंचालक सु. हे. आग्रेकर व अकोला जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपसंचालक प्रफुल्ल पांडे यांनी केले आहे.