अकोला, दि.9 :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आज आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात २४९ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. त्यात प्रमुख चार आस्थापनांनी सहभाग घेतला. भरती प्रक्रियेसाठी ५०७ उमेदवारांनी आपला सहभाग नोंदविला तर निवड प्रक्रियेनंतर १८४ जणांची प्राथमिक निवड झाली,अशी माहिती जिल्हा रोजगार स्वयंरोजगार व कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त द.ल. ठाकरे यांनी दिली.
दर महिन्याच्या आठ तारखेला पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन जिल्हा प्रशासनातर्फे केले जाते. यावेळी या मेळाव्यात उत्कर्ष स्मॉल फायनन्स लि.मध्ये कारंजा, वाशिम, जळगांव, पाचोरा व चाळीसगाव शाखेकरीता, रॉयल क्रॉप सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी प्रा.लि.अकोला, क्रेडीट ॲक्सेस ग्रामीण लि., बडवे इंजिनियरिंग औरंगाबाद आणि पुणेकरीता या आस्थापनांसाठी २४९ पदभरतीसाठी रोजगार मेळाव्यात भरती प्रक्रिया राबविण्यात आली. या मेळाव्यात जिल्ह्यातील ५०७ उमेदवारांनी सहभाग नोंदविला. त्यात १८४ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे.
जिल्हा प्रशासनातर्फे दर महिन्याच्या आठ तारखेला रोजगार मेळाव्याचे आयोजन केले जाते. या मेळाव्यात सहभागासाठी नोंदणी करता येते. त्यासाठी कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन आपल्या सेवायोजन कार्डचा युझर आयडी व पासवर्डचा वापर करुन शैक्षणिक पात्रतेनुसार अर्ज करावा. तसेच इतर जिल्ह्यातील उमेदवारही अर्ज शकतात. ज्या उमदेवारांनी अद्याप सेवायोजन कार्ड नोंदणी केलेली नाही त्यांनी www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर तात्काळ नोंदणी करुन आपल्या शैक्षणीक पात्रतेच्या आधारे ऑनलाईन अर्ज करुन संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे. त्यासाठी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. जॉबसिकर अर्थात (Find a job) हा पर्याय निवडून आपला नोंदणी क्रमांक किंवा आधारक्रमांक आणि पासवर्ड वापरुन लॉगईन करा. आपल्या प्रोफाईल मधील होमपेजवरुन पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा हा पर्याय निवडा नंतर अकोला जिल्हा निवडा. होऊ घातलेल्या पुढच्या मेळाव्यात सहभागासाठी क्लिक करा.I Agree हा पर्याय निवडा. आपल्या पात्रतेनुसार पदाची निवड करुन Apply बटनावर क्लिक करा. अधिक माहितीसाठी ०७२४-२४३३८४९या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.