अकोला, दि.9 :- केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अमृत सरोवरांकाठी स्वातंत्र्य दिनी (सोमवार,दि.१५) ध्वजवंदन होणार आहे. विशेष म्हणजे या ध्वजवंदनासाठी त्या त्या गावातील स्वातंत्र्य सैनिक, त्यांचे वारस, शहिदांचे वारस, विर माता, विर पिता, विर पत्नी, ज्येष्ठ नागरिक यांना सन्मानाने पाचारण केले जाणार आहे.
अकोला जिल्ह्यातही राष्ट्रीय महामार्ग विभागाच्यावतीने अमृत सरोवर तयार करण्यात आले आहेत. त्यातील २० सरोवरांवर ध्वजवंदन कार्यक्रमाचे आयोजन सोमवार दि.१५ रोजी करण्यात आले आहे. त्यात अकोला तालुक्यातील मलकापूर, बोरक़्गाव, रंभापूर, पैलपाडा, अन्वी, निपाणा, उमरी परगणे, शिवणी, बाभुळगाव, बाळापूर तालुक्यातील गाडेमोड, मुर्तिजापूर तालुक्यातील राजनापुर खिनखिनी, हातगाव, लासनापूर, किनखेड, कंझारा, वणी माना, धानोरा बु. अशा गावांमधील सरोवरांच्या काठी हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती सहायक जलसंधारण अधिकारी राजेश गिरी यांनी दिली. नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हा मृद व जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते यांनी केले आहे.