अकोला दि.4: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘घरोघरी तिरंगा’ हे अभियान दि.१३ ते १५ ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्ण तयारी करीत आहे. प्रत्येक घरावर तिरंगा झेंडा फडकवण्यासाठी उपलब्ध करुन देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तरी या राष्ट्रीय पर्वात सगळ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज पत्रकार परिषदेत केले.
घरोघरी तिरंगा या अभियानासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या तयारीबद्दल माहिती देण्यासाठी व नागरिकांना आवाहन करण्यासाठी आज पत्रकार परिषदेचे आयोजन लोकशाही सभागृहात करण्यात आले. या पत्रकार परिषदेस जिल्हाधिकारी श्रीमती अरोरा यांच्या समवेत मनपा आयुक्त कविता द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे आदी उपस्थित होते.
पत्रकार परिषदेच्या प्रास्ताविकात निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी माहिती दिली की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त घरोघरी तिरंगा हे अभियान दि.१३ ते १५ ऑगस्ट २०२२ दरम्यान राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या आयोजनासाठी सर्व शासकीय विभाग, विविध सामाजिक, सेवाभावी संस्था, समाजातील विविध घटक सहभागी होत आहेत. अकोला जिल्ह्यातील घरांची संख्या लक्षात घेता जिलह्यात ४ लाख ६ हजार ५८४ झेंड्यांची उपलब्धता करण्यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे. झेंड्यांची उपलब्धता व वितरणाचे नियोजन करण्यात आले आहे. या अभियानाबाबत जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात रिले शर्यत, मोटार सायकल रॅली, मॅरेथॉन शर्यत, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत जिल्हा क्रीडा संकुल येथे सामुहिक गिटारवादन, फ्लॅश मॉब, बॅण्ड पथकांद्वारे शहरातील विविध भागात देशभक्तीपर गितांचे सादरीकरण असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
मनपा आयुक्त कविता द्विवेदी यांनी सांगितले की, महानगरपालिकेतर्फे झेंड्यांचे वितरण करण्यासाठी क्षेत्रिय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक घरी भेट देण्यासाठी हे कर्मचारी पोहोचतील. दि.१० ऑगस्ट पर्यंत वितरण पूर्ण करण्याचे नियोजन आहे. झेंडा देतांना झेंड्याचा सन्मान कसा राखावा याबाबतच्या मार्गदर्शक सुचनांचे छापील पत्रक सोबत देण्यात येणार आहे. सर्व नागरिकांनी हे पर्व उत्साहात साजरे करावे, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार म्हणाले की, जिल्हा परिषदेने ग्रामीण भागात ‘उमेद’ च्या बचतगटांमार्फत झेंडे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीत झेंडे उपलब्ध असतील. प्रत्येक शाळा, ग्रामपंचायतीमार्फत नियोजन करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.
अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांनी सांगितले की, सर्व शासकीय विभागांसमवेत पोलीस दलही या अभियानात सक्रीय सहभागी राहणार आहे. त्यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशननिहाय नियोजन करण्यात आले आहे. जनजागृतीचा भाग म्हणून करावयाच्या सर्व उपक्रमात पोलीस दल सक्रीय सहभागी आहे,असे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय विभाग हा उत्सव अधिक उत्साहात साजरा व्हावा यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यात नागरिकांनी सहयोग द्यावा. हा राष्ट्रीय सण असल्याने या उत्सवात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे,असे आवाहन त्यांनी केले.
शुक्रवारी(दि.5) लोकप्रतिनिधी व स्वयंसेवी संस्थांची बैठक
घरोघरी तिरंगा अभियानासंदर्भात शुक्रवार दि. 5 रोजी जिल्हा नियोजन भवन येथे सायंकाळी 4 वाजता जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी सन्मानित आमदार, खासदार, जि.प.अध्यक्ष तसेच विविध सामाजिक स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांची बैठक होणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
जनजागृतीसाठी आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमांचे वेळापत्रकः-
दि.८ रोजी अकोला शहरात रिले शर्यत, दि.९ रोजी स्वराज महोत्सव, दि.१० रोजी मोटार सायकल रॅली, दि.११ रोजी महिलांची मोटारसायकल रॅली, दि.१२ रोजी सायकल यात्रा, दि.१३ रोजी पोलीस विभागातर्फे मॅरेथॉन शर्यत, दि.१४ रोजी क्रीडा संकुल येथे गिटार वादन व योगीक क्रियांचे सादरीकरण, दि.१५ रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध कार्यक्रम.
या पत्रकार परिषदेत उपस्थित पत्रकारांनाही राष्ट्रीय ध्वजांचे वितरण करण्यात आले.
निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी उपस्थितांचे आभार मानले.