अकोला दि.4: येथील स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था येथे ‘अॅनिमल राहत’संघटनेच्या वतीने ‘बैलांचे मानवीय व वेदनारहित पद्धतीने खच्चीकरण’, याबद्दल पशुवैद्यकांना प्रशिक्षण देण्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांचे संयुक्त विद्यमाने हे प्रशिक्षण आयोजीत करण्यात आले होते.
अध्यक्षस्थानी सहयोगी अधिष्ठाता डॉ. धनंजय दिघे, तर प्रमुख अतिथि म्हणून डॉ. एस. डी. चव्हाण उपस्थित होते. पशुधनाच्या संवर्धंनासाठी सुनियोजित पैदासव्यवस्थापन गरजेचे असते म्हणून गोवंश व तत्सम पशुधनात बैलांचे खच्चीकरण (नसबंदी) केले जाते. मात्र पशुपालक पारंपारीक अमानवी पद्धतीने आणि पशुवैद्यकाशिवाय बैलांचे खच्चीकरण करतात. अशा परिस्थितीत बैलांचे मानवीय पद्धतीने हाताळणी आणि भूल देत वेदनाशामक पद्धतीने खच्चीकरण करणे पशुंच्या कल्याणासाठी महत्वाचे असल्याने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. अॅनिमल राहत संघटनेचे डॉ. चेतन यादव (९५५२५५९१४६) यांनी प्रात्यक्षीक दाखविले.डॉ. नरेश उप्रेती, मुख्य ऑपरेटिंग अधिकारी (९५५२५५२०४२) यांनी प्रशिक्षणा दरम्यान पशुवैद्यकांनी प्रक्षेत्रावर वेदनाशामक व भूल औषधीचे करावयाचे व्यवस्थापन, पशुकल्याण, प्राणी क्रूरता अधिनियम १९६० व पशुकल्याण विषयक कायदे याबाबत माहिती दिली. याप्रसंगी उपस्थितांना बैलांचे खच्चीकरण करताना प्रचलित पद्धतीपेक्षा कल्याणकारी आणि वेदनारहित पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन केले. या प्रशिक्षणात १२० पशुवैद्यक विद्यार्थी, अधिकारी, प्राध्यापक सहभागी होते. प्रास्ताविक प्रात्यक्षिक समन्वयक डॉ. मिलिंद थोरात यांनी, प्रशिक्षण समन्वयक डॉ. प्रवीण बनकर यांनी सूत्रसंचलन, सहसमन्वयक डॉ. श्याम देशमुख आणि डॉ रत्नाकर राऊळकर यांनी आभारप्रदर्शन केले.