अकोला दि.3: राजराजेश्वर मंदिरात जलाभिषेक करण्याच्या परंपरेचा भाग म्हणून साजरा होणारा कावड पालखी सोहळा उत्साहात व्हावा, यासाठी प्रशासन भक्तांना आवश्यक सुविधांची पूर्तता करेल; तर उत्सव शांततेत पार पाडावा यासाठी कावड पालखी मंडळांनी प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज येथे कावड पालखी उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना केले.
जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सांगितले की, उत्सव साजरा करण्यास कोणतीही बंदी नसली तरी त्यासाठी आवश्यक परवानगी स्थानिक पोलीस स्टेशन मधून घेऊन नियमांचे पालन करणे आवश्यक असेल.
कावड पालखी उस्तवाच्या अनुषंगाने कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्व मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आज जिल्हा नियोजन भवनात पार पडली. बैठकीस जिल्हाधिकारी निमा अरोरा,पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर, मोनिका राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार,उपविभागीय पोलीस अधिकारी राऊत, दुधगावकर तसेच पालखी उत्सव मंडळांचे राजेश भारती, हभप तुळशीदास मसने महाराज, चंदू सावजी तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पालखी उत्सवाचे नियोजन उत्तम असावे यासाठी पालखी कावड मार्गाची दुरुस्ती, पूर्णा नदी पात्रात सुरक्षा व्यवस्था, प्रकाश व्यवस्था, बचाव पथक, रुग्णवाहिका,वैद्यकीय पथक, पालखी मार्गावरील अतिक्रमणे हटविणे, राजराजेश्वर मंदिर परिसरातील गर्दीचे नियमन याबाबत मागण्या मांडल्या. तसेच उत्सवात सहभागी होतांना भाविकांनीही प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले.
आपल्या संबोधनात पोलीस अधीक्षक जी. श्रीधर म्हणाले की, उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज आहे. लाऊड स्पिकर आदींबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करणे आवश्यक असून सकाळी सहा ते रात्री 10 या वेळात लाऊड स्पिकर वापरण्यासाठी स्थानिक पोलीस स्टेशन मधून परवानगी घेणे आवश्यक आहे. बंदी कशालाही नसली तरी पूर्वपरवानगी व नियमपालन आवश्यक असेल असे त्यांनी स्पष्ट केले. मंडळांच्या कार्यकर्त्यांनी गणवेश वा समान टि शर्ट परिधान केल्यास पोलीस प्रशासनास मदत होईल असे सांगितले. पालखी मार्गावरील अतिक्रमणे व अन्य दुकाने हटविण्यासाठी मनपा सोबत पोलीस प्रशासन संयुक्त कारवाई करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी श्रीमती अरोरा म्हणाल्या की, पालखी मार्गावरील रस्ते, लाईट, रुग्ण्वाहिका,बचाव पथके अन्य सुरक्षा व्यवस्था आदी सुविधा अधिकाधिक देण्यासाठी प्रशासन संबंधित विभागांचे सहकार्य घेऊन प्रयत्न करत आहे. शेवटच्या श्रावणी सोमवार पर्यंत जास्तीत जास्त सुविधा देऊन पालखी कावड उत्सव उत्साहात साजरा व्हावा असेच प्रशासनाचे नियोजन असेल. तसेच मंडळांनीही प्रशासनाला उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे,असे आवाहन त्यांनी केले.
‘हर घर तिरंगा’साठी पालखी मंडळांनी योगदान द्यावे- संजय खडसे
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा हे अभियान दि.13 ते 15 ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणार आहे. या अभियानात पालखी मंडळांनी सहभागी व्हावे, अधिकाधिक लोकांनी त्यात सहभाग द्यावा यासाठी आवाहन करावे. तसेच राष्ट्रध्वज खरेदी करुन लोकांना ते द्यावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले.
सभेचे संचलन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले. या बैठकीत मंडळांच्या वतीने राजेश भारती, हभप तुळशीदास मसने महाराज, गोपाल नागापुरे, विठ्ठल गाडे, पप्पू वानखडे, पप्पू मोरवाल, हिरामण कुंभारे आदींनी मनोगत व्यक्त करुन भुमिका मांडली.