अकोला दि.29: देशाने ऊर्जा क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केली असून यामध्ये महावितरणाचा मोठा वाटा आहे. वीज ही विकासाची जननी असून जीवनाचा अविभाज्य घटक आहे. समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत वीज पोहोचवण्याची महावितरणची कामगिरी कौतुकास्पद आहे, असा सूर विविध मान्यवरांनी उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य’ महोत्सव या कार्यक्रमात लावला, व महावितरण च्या कामगिरीचे कौतुक केले.
जिल्हा नियोजन भवन येथे केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालय, राज्य शासन आणि ऊर्जा विभागातर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत ‘उज्वल भारत, उज्वल भविष्य, पॉवर @2047’ चा ऊर्जा महोत्सवाच्या कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभाताई भोजने, विधान परिषद सदस्य आमदार वसंत खंडेलवाल, विधान सभा सदस्य आ. गोवर्धन शर्मा, आ. हरिष पिंपळे, जिल्हाधिकारी निमा अरोरा, पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता अनिल डोये, अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट, नोडल अधिकारी दिपक जैन आदि उपस्थित होते.
कार्यक्रमात जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभाताई भोजने म्हणाल्या की, विज समस्यांबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी असतात याबाबत त्यांना नाराजीचाही सामाना करावा लागतो. तरी सुद्धा महावितरणचे अधिकारी व कर्मचारी सयमी स्वभावाने मानवी सेवा करीता असतात. अनेकवेळा त्यांना जीवावर बेतून काम करावी लागतात. त्यांचे कामे कौतुकास्पद आहे. या महोत्सवानिमित्त शासनाच्या योजना व उपक्रमाचा लाभ सामाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवावे, असे आवाहन त्यांनी केले.
आमदार हरिष पिंपळे म्हणाले की, सर्व क्षेत्रामध्ये विजेची मोठी मागणी आहे. विशेषत: ग्रामीण भागात वीज पुरवठा मुबलक होत नसल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. महावितरणाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ग्रामीण भागापर्यंत सुरळीत विज पुरवठा होईल याकरीता प्राधान्याने काम करावे, असे आवाहन यावेळी केले.
आमदार गोवर्धन शर्मा म्हणाले की, महावितरणाची जिल्ह्यातील कामगिरी उल्लेखनिय असून विशेषत: काही दिवसापुर्वी अतिवृष्टी व पुरामुळे नदीकाठच्या भागातील विजपुरवठा खंडीत झाला होता. अशावेळी महावितरणाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अहोरात्र काम करुन विजपुरवठा सुरळीत चालु केला. सेवा देण्याचे महत्वाचे काम महावितरण कर्मचारी करीत असल्याचे मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी वीज ग्राहकांसाठी असलेले कायदे, ग्राहकांचे हक्क आदीबाबत जनजागृती महावितरणचे संजय फुंडकर आणि चमूने लघु नाटिकेद्वारे केली. तसेच शाहीर खंडूजी सिरसाट यांनी लोककलापथकाद्वारे महावितरणच्या विविध योजना समजून सांगितल्या.
देशाने ऊर्जा क्षेत्रामध्ये केलेल्या कामगिरीवर चित्रफितीच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात आला. यावेळी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थीना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. लाभार्थीनी विजेमुळे त्यांच्या जीवन आणि उत्पन्नात पडलेली भर याबाबत मनोगत व्यक्त केले. महावितरणचे अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालनअशोक पेटकर यांनी तर आभार प्रदर्शन नोडल अधिकारी दिपक जैन यांनी केले.