अकोला दि.२८: अतिविशेषोपचार (सुपरस्पेशालिटी) रुग्णालयात उपचार सुविधा देण्यास सोमवार दि.१ ऑगस्ट पासून सुरुवात करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहेत.
दरम्यान दि. १ ऑगस्टपासून सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हृदयरोग, किडनी रोग, बर्न व प्लास्टिक सर्जरी, मेंदू विकार हे चार विभाग कार्यान्वित होतील. तसेच सर्वोपचार रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाह्य रुग्ण कक्षातून संदर्भित केलेल्या रुग्णांवर येथे उपचार होतील,असेही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाला आज सकाळी झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी श्रीमती अरोरा यांनी निर्देश दिलेत. त्यानुसार उपलब्ध मनुष्यबळ व साधनसामुग्री यांचा विचार करता व भविष्यात टप्प्याटप्प्याने मनुष्यबळ प्राप्त होईपर्यंत सुपर स्पेशालिटी रुग्णालयात मर्यादित सुविधा देण्यास सुरुवात करावी. त्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून रुग्ण संदर्भित करुन त्यांचेवर सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार होतील,असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
त्यानंतर लगेचच सुपरस्पेशालिटी रुग्णालय कार्यान्वित करण्याबाबत जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनास लेखी निर्देश दिलेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास दिलेल्या निर्देशात म्हटले आहे की, दि. ७ जुलै रोजी जिल्ह्याचे पालक सचिव सौरभ विजय यांनी जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यांनी बैठक घेऊन सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुरु करण्याचे निर्देश दिले होते. सुपर स्पेशालिटी रुग्णालय कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळासाठी निविदा काढण्यात आली आहे. ही निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. परवानगीच्या अधिन राहून ५० टक्के मनुष्यबळ नियुक्ती पूर्ण करावी. सोमवार दि. १ ऑगस्ट २०२२ पासून सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचा बाह्यरुग्ण कक्ष संदर्भित रुग्णांसाठी कार्यान्वित करावा. नंतर मनुष्यबळ उपलब्धता जसजशी होईल तसेच रुग्णालय कार्यान्वयन करतांना संभावित अडचणी दूर होत जातील, तशा सुविधा वाढविण्यात येतील, याप्रमाणे नियोजन करावे,असे जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी निर्देशात स्पष्ट केले आहे.
त्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी तात्काळ कारवाई करत एक सुचना जारी केली आहे. त्यानुसार, सोमवार दि.१ ऑगस्ट २०२२ पासून सकाळी ९ ते दुपारी एक वाजेपर्यंत सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचा बाह्यरुग्ण तपासणी कक्ष कार्यान्वित करण्यात येत असून हा बाह्य रुग्ण कक्ष सर्वोपचार रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून संदर्भित रुग्णांसाठीच असेल. हृदयरोगशास्त्र विभाग, मेंदू विकार (न्युरो) सर्जरी विभाग, बर्न व प्लास्टिक सर्जरी विभाग व किडनीरोग विभाग हे विभाग कार्यान्वित होतील,असे अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला यांनी स्पष्ट केले आहे.