अकोला दि.27: शासकीय कार्यालयांमध्ये मराठी भाषेचा वापर, शाळा महाविद्यालयांमधून मराठी भाषा शिक्षणाला व वापराला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करुन मराठी भाषेच्या वापराला अधिकाधिक चालना देण्यात यावी, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिले.
निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात मराठी भाषा वापराबाबत मराठी भाषा समितीची बैठक आज पार पडली. याबैठकीस उपजिल्हाधिकारी पुनर्वसन तथा मराठी भाषा अधिकारी सदाशिव शेलार, अशासकीय सदस्य ॲड. मयुर लहाने, डॉ. विनय दांदळे, सुरेश पाचकवडे व शाम ठक उपस्थित होते.
निवासी उपजिल्हाधिकारी खडसे म्हणाले की, मराठी भाषेचा वापर सर्व स्तरावर होण्यासाठी राजभाषा अधिनियमानुसार उपाययोजना करावी. त्यात सर्व शासकीय व निम्म शासकीय कार्यालयाचे फलक मराठी भाषेत लावणे, मराठी भाषेचा वापर करणे, राष्ट्रीयकृत बॅंकांमधील व्यवहारात मराठी भाषेचा वापर करणे, दुकाने व संस्थाचे नावाचे फलक मराठीत लावणे इ.उपाययोजना प्राधान्याने राबवाव्या. तसेच जिल्हा व ग्रामीण भागातील शाळा व महाविद्यालयामध्ये विविध उपक्रमाव्दारे मराठी भाषेचा वापराबाबत जनजागृती करावी, इंग्रजी, हिंदी व उर्दू माध्यमांच्या शाळेमध्ये मराठी भाषा शिक्षणास चालना देण्यासाठी विविध कार्यक्रम राबवावे. याकरीता जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी नियोजन करावे, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिले.