देशाच्या पंधराव्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती एन. व्ही. रमणा यांच्याकडून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. मुर्मू या पहिल्या आदिवासी तर दुसऱ्या महिला राष्ट्रपती (President ) ठरल्या आहेत. मूळच्या ओडिशाच्या असलेल्या मुर्मू यांनी याआधी झारखंडचे राज्यपाल म्हणून काम पाहिलेले आहे.
संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये सकाळी सव्वा दहा वाजता झालेल्या शानदार कार्यक्रमात सरन्यायाधीशांनी द्रौपदी मुर्मू यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्रिमंडळातील बहुतांश मंत्री, विविध पक्षीय खासदार, नेते, अनेक देशांचे राजदूत लष्कर अधिकारी व इतर क्षेत्रातील मान्यवर शपथविधीच्या कार्यक्रमास उपस्थित होते. आपल्या बहिणीचा शपथविधीचा कार्यक्रम पाहण्यासाठी खास ओडिशाहून द्रौपदी मुर्मू यांचे बंधू व त्यांच्या पत्नी दिल्लीला आले होते.
President Draupadi Murmu : सर्वात कमी वयाच्या राष्ट्रपती
शपथ घेण्यापूर्वी द्रौपदी मुर्मू यांनी सकाळी राजघाटवर जाऊन महात्मा गांधींच्या समाधीचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी राष्ट्रपती भवनात जाऊन मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद तसेच त्यांच्या पत्नी सविता यांची भेट घेतली. अलीकडेच झालेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मुर्मू यांनी विरोधी आघाडीचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव केला होता. 64 वर्षीय द्रौपदी मुर्मू या देशाच्या सर्वात कमी वयाच्या राष्ट्रपती ठरल्या आहेत. भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने गेल्या 21 जून रोजी राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली होती.
आपण आदिवासी समाजासाठी आयुष्यभर काम केले आणि नगरसेवकापासून ते राष्ट्रपती बनण्यापर्यंतची संधी मिळाली. ही संधी म्हणजे लोकशाहीची जननी असलेल्या भारतवर्षाची महानता असल्याचे भावूक उद्गार मुर्मू यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतल्यानंतर काढले. दुर्गम आदिवासी भागात जन्मलेली मुलगी राष्ट्रपती पदापर्यंत जाते, यातून देशाची लोकशाही किती सशक्त आहे, हे दिसून येते. ज्या भागातून आपण आयुष्याची सुरुवात केली, त्या ठिकाणी प्राथमिक शिक्षण हे एका स्वप्नासारखे होते. पण अनेक संकटावर मात करीत शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयात जाणारी मी गावातली पहिली मुलगी होती.
26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस आहे. या दिनाच्या शुभेच्छा मुर्मू यांनी दिल्या. हा दिवस भारतीय लष्कराच्या शौर्य आणि संयम दोन्हींचे प्रतिक असल्याचे मुर्मू यांनी सांगितले. स्वातंत्र्य सैनिकांनी देशासाठी लढताना ज्या अपेक्षा बाळगल्या होत्या, त्या अपेक्षांच्या पुर्ततेसाठी जनतेला स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात जास्त वेगाने काम करावे लागणार आहे. ‘सर्वांचे प्रयत्न आणि सर्वांचे कर्तव्य’ यातूनच अमृतकाळाच्या सिद्धीचा रस्ता जाणार आहे, असे मुर्मु यांनी नमूद केले. मुर्मू यांनी शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह इतर मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रपती पदाची शपथ घेतल्यानंतर मुर्मू या राष्ट्रपती भवनात गेल्या. याठिकाणी त्यांना एकवीस तोफांची सलामी देण्यात आली तर इंटरगार्ड सर्व्हिसेसकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.
President Draupadi Murmu : द्रौपदी मुर्मू यांच्या विषयी थोडक्यात
भारताच्या १५ व्या राष्ट्रपती आणि पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा आदिवासी पाडा ते राष्ट्रपती भवन हा प्रवास थक्क करणारा आहे.
सोमवारी (१८ जुलै २०२२) राष्ट्रपती पदासाठी देशभरात मतदान झाले. गुरुवारी (२१ जुलै) या निवडणुकीचा निकाल लागला. द्रौपदी मुर्मू यांना ५ लाख ७७ हजार ७७७ मते मिळाली
त्या भारताच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती तर भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत. पहिल्या राष्ट्रपती होण्याचा मान प्रतिभाताई पाटील यांनी मिळाला होता.
द्रौपदी मुर्मू यांचा जन्म ओडीसा राज्यातील मयूरभंज जिल्ह्यातील बैदापोसी गावात २० जून १९५८ रोजी झाला. त्यांचे वडील बिरंची नारायण टुडू हे संथाल आदिवासी जमातीचे तालुका प्रमुख होते.
१९७९ मध्ये भुवनेश्वरमधील रमादेवी महिला विद्यापीठातून त्यांनी कला (Arts) शाखेतून पदवी घेतली.
द्रौपदी यांचा विवाह श्याम चरण मुर्मू यांच्याशी झाला. त्यांना एकूण ३ मुले. काही वर्षानंतर त्यांचे पती, त्यानंतर दोन्ही मुलांचा मृत्यू झाला. आता त्यांना एकच मुलगी आहे.
त्यांनी आपल्या घराचा डौलारा सांभाळण्यासाठी पतीच्या निधनानंतर शिक्षकेची नोकरी स्वीकारली.
द्रौपदी यांचा कौटुंबिक प्रवास जसा संघर्षमय आहे तसा त्यांचा राजकीय प्रवासही थक्क करणारा आहे.
त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात ही नगरसेविका पदापासून सुरू झाली. १९९७ साली त्यांनी रायरंगपूरच्या नगर पंचायतच्या नगरसेवक पदाची निवडणूक जिंकली.
काही दिवस भाजपच्या रायरंगपूर राष्ट्रीय सल्लागार परिषदेच्या उपाध्यक्षा म्हणून काम केले.
२००० आणि २००९ मध्ये ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील रायरंगपूर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक जिंकली.
६ मार्च २००० ते ६ ऑगस्ट २००२ पर्यंत वाणिज्य आणि परिवहन राज्यमंत्री तर ६ ऑगस्ट २००२ ते १६ मे २००४ पर्यंत मत्स्य व्यवसाय आणि पशु संसाधन विकास राज्यमंत्री होत्या.
मे २०१५ मध्ये द्रौपदी मुर्मू झारखंडच्या राज्यपाल झाल्या. झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल होण्याचा मानही द्रौपदी मुर्मू यांना मिळाला. राज्यपाल झालेल्या त्या पहिल्या आदिवासी महिला आहेत.
आज द्रौपदी मुर्मू भारताच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत. त्यांनी आज भारताच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणुन शपथ घेतली आहे. आदिवासी पाडा ते राष्ट्रपती असा त्यांचा प्रवास हा थक्क करणारा आहे.