अकोला दि.22: भारत सरकारचे स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय अभियांनांतर्गत जिल्हा स्तरावरील 38 शाळांची स्वच्छ विद्यालय पुरस्कार 2021-22 करीता निवड झाली आहे. निवड झालेल्या शाळांना जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते आज पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. स्वच्छ विद्यालय अभियानात सर्व शाळांनी स्वयंस्फुर्तीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, शिक्षणाधिकारी माध्यमिक सुचिता पाटेकर, शिक्षणाधिकारी माध्यमिक वैशाली ठग, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थाचे प्राचार्य डि.डि.नागरे, किड्स वर्ल्ड एज्युकेशन मुंबई सल्लागार निता नगरकर, जिल्हा समन्वयक गजानन महल्ले, जिल्हा परिषदचे मुख्याधिकारी, प्राचार्य आदि उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार म्हणाले की, सर्व शाळेनी स्वच्छ अभियानात सक्रिय सहभाग घेवून आदर्श शाळा निर्माण होईल याकरीता प्रयत्न करावे. शाळेला शिस्त लावण्यासाठी शाळा स्वच्छ ठेवणे आवश्यक असल्याचे मनोगत व्यक्त केले.
स्वच्छ विद्यालय पुरस्कारात जिल्हास्तरावरील निवड झालेल्या सर्वसाधारण श्रेणीमध्ये आठ पुरस्कार तर उपश्रेणीमध्ये 30 पुरस्कार वितरण करण्यात आले. सर्वसाधारण श्रेणीमध्ये ग्रामीण भागातील प्राथमिक व माध्यमिक शाळांना प्रत्येकी तीन प्रमाणे सहा पुरस्कार तर शहरी भागातील प्राथमिक व माध्यमिक शाळांना प्रत्येकी एक प्रमाणे दोन पुरस्कार वितरण करण्यात आले. त्यात संत पॉल पब्लिक स्कूल, अकोट, श्री.आरएलटी कॉलेज, आनंदी किड्स स्कूल बाबुळगाव, नारायणराव बिहाडे विद्यालय वरुड बु, जिल्हा परिषद उर्दू स्कूल हातगाव, विद्याचंल स्कूल अकोट, जिल्हा परिषद शाळा खंडाला व जि.प. क्र.22 मराठी मुलांची शाळा यांना पुरस्कार सर्वसाधारण श्रेणीतून पुरस्कार वितरण करण्यात आले. तसेच उपश्रेणीतील ग्रामीण भागातील 12 प्राथमिक व सहा माध्यमिक शाळांना तर शहरी भागातील प्राथमिक व माध्यमिक शाळांना प्रत्येकी सहा पुरस्कार वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जिल्हा परिषदचे सहायक कार्यक्रम अधिकारी नंदकिशोर लहाने यांनी तर आभार प्रदर्शन विस्तार अधिकारी विनोद मानकर यांनी केले.