अकोला दि.20: गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील तलाव पाण्याने भरले आहेत. अशा परिस्थितीत पावसाळी पर्यटनासाठी हौशी पर्यटक तलावांवर जाऊन आनंद लुटत असतात, तथापि, अशा उत्साहात अनाठायी धाडस करुन अपघात होण्याची शक्यता लक्षात घेता, पुढील आदेश येई पर्यंत जिल्ह्यातील जलसंधारण विभागाच्या तलावांवर प्रवेशास मनाई करण्यात आली असल्याचे, जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते यांनी कळविले आहे. त्यांनी कळविल्यानुसार, मृद व जलसंधारण विभागाच्या अधिनस्त बोरगांव, सिंसा उदेगांव, कुंभारी, सुकळी, घोंगा, पिंपळशेंडा, कानडी, भिलखेड, चिचपाणी, धारूर सावरगांव बु. झरंडी, हिवरा, कऱ्ही, पूनौती, वडगांव, वस्तापूर, पारस, गायगांव, कवळा, कोथळी, आखतवाडा, मोयापाणी, वाघा, धानोरा पाटेकर, दधम व हसनापूर इ. सर्व गाव तलाव, पाझर तलाव, साठवण तलाव, सिंचन तलावाच्या स्थळी पुढील आदेश होईपावेतो प्रवेश मनाई करण्यात आली आहे.
अतिवृष्टी व पर्यटन स्थळी जास्त प्रमाणात गर्दी झाल्याने अपघाताची शक्यता असल्याने ही मनाई करण्यात आली आहे. त्यासाठी गाव तलाव, पाझर तलाव, साठवण तलाव, सिंचन तलावांच्या स्थळी प्रवेश करण्याचा प्रयत्न नागरीकांनी करू नये. तसे केल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल, याची नागरीकांनी नोंद घ्यावी. तसेच आपल्या सुरक्षेस्तव या आदेशाचे काटेकोरपणे पालन करून नागरीकांनी मृद व जलसंधारण विभागास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.