अकोला दि.१९: जिल्ह्यातील पत्रकार व माध्यमकर्मींसाठी कोविड लसीकरणाचे शनिवार दि.२३ रोजी विशेष सत्राचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात करण्यात आले असून या शिबिरात पत्रकार, माध्यमकर्मी व त्यांचे कुटुंबिय यांना लसीकरण करुन घेता येईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी सांगितले.
यासंदर्भात आज बैठक घेण्यात आली. बैठकीस जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकत अली मिरसाहेब, श्रमिक पत्रकार संघाचे अजय डांगे, बहुजन पत्रकार संघाचे सुधाकर खुमकर, इलेक्ट्रॉनिक मिडियाचे धनंजय साबळे, मधु कसबे तसेच अनिल माहोरे, लसीकरण समन्वयक डॉ. मनिष शर्मा, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने आदी उपस्थित होते.
कोविड लसीकरणासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विशेष अभियान राबविण्यात येत आहे. त्यात पत्रकारांनी आपले, आपल्या कार्यालयीन सहकाऱ्यांचे व कुटुंबियांचे लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन संजय खडसे यांनी केले. त्यानुसार शनिवार दि.२३ रोजी सकाळी १० वाजता, जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात विशेष सत्र आयोजित करण्यात येईल, त्यात सर्व पत्रकारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. लसीकरणासाठी येतांना आधार कार्ड व मोबाईल फोन आणावा,असे आवाहन करण्यात आले आहे.