(Monsoon Session) महागाई व जीएसटी दरवाढीवरून विरोधकांनी लोकसभा आणि राज्यसभेत प्रचंड गदारोळ घातला. या गदारोळामुळे लोकसभा व राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले आहे. विविध मुद्यांवर विरोधी सदस्यांनी केलेला गदारोळ आणि आज राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान झाल्यामुळे राज्यसभेचे कामकाज पावसाळी अधिवेशनाच्या (Monsoon Session) पहिल्या दिवशी सोमवारी (ता. १८) सुरू झाल्यानंतर तासाभरातच दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
काँग्रेसचे अनेक सदस्य आसनाजवळ आले आणि विविध मागण्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी सुरू केली. महागाईसह विविध मुद्द्यांवर ते सरकारला जाब विचारत होते. व्यंकय्या नायडू यांनी सदस्यांना शांत राहण्याचे आणि सभागृहाचे कामकाज चालू देण्याचे आवाहन केले. मात्र, गोंधळ घालणाऱ्या सदस्यांवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही.
यावर व्यंकय्या नायडू म्हणाले की, काही सदस्यांनी सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, असा निर्णय घेतल्याचे दिसते. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सदस्यांना मतदान करता यावे, यासाठी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करत असल्याचे व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu) यांनी सांगितले.
पावसाळी अधिवेशनाच्या (Monsoon Session) पहिल्या दिवशी राज्यसभा आणि लोकसभेच्या खासदारांना शपथ देण्यात आली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी नवीन सदस्यांना शपथ दिली. तर राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी नवनिर्वाचित सदस्यांना सदस्यत्वाची शपथ दिली. यानंतर नायडू म्हणाले की, त्यांच्या कार्यकाळातील हे शेवटचे अधिवेशन आहे. यावेळी प्रत्येकाकडून काही ना काही शिकायला मिळाले. हे अधिवेशन सार्थक करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजे, असेही व्यंकय्या नायडू म्हणाले.