बेळगाव : महाराष्ट्रातील पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर असल्याने व सर्व नद्यांतून पाणी वाहून येण्याचे प्रमाण वाढल्याने आलमट्टी जलाशयातील पाण्याचा विसर्ग बुधवारी संध्याकाळी वाढविला. महाराष्ट्रातील धरणांतून विसर्ग सुरू झाल्यास पातळी झपाट्याने वाढून पूरस्थिती निर्माण होण्याची भीती असली तरी सध्या बेळगाव जिल्ह्यात पूरस्थिती नाही. सकाळी 1 लाख असलेला विसर्ग संध्याकाळी 1 लाख 25 हजार क्युसेक इतका केला आहे. आता आलमट्टी जलाशयांत 1 लाख 13 हजार 528 क्युसेक इतक्या पाण्याची आवक सुरू आहे. म्हणून विसर्ग वाढविताना तो सव्वालाख इतका केला आहे. सध्या धरणात 88.63 टीएमसी पाणीसाठा आहे. 519.60 मीटर इतकी पाणीपातळी झाल्यास साठा 123.01 टीएमसी होतो. सध्या धरणाची पाणी पातळी 517.33 मीटर असून, साठा 72.05 टक्के आहे.
आलमट्टी धरणातील आवक व जावककडे कर्नाटक व महाराष्ट्र प्रशासनाचे लक्ष लागलेले असते. दोन्ही राज्यांनी यावर्षी समन्वयाने पाणी पातळीची माहिती देवाण-घेवाण सुरू केली आहे. जिल्ह्यातील कल्लोळ धरणाजवळ 1 लाख 12 हजार क्युसेक पाणी वाहून जात आहे. राजापूर बंधाऱ्याजवळ नदीत 88 हजार 500 क्युसेक पाणी वाहत आहे. दूधगंगा धरणाजवळ 23 हजार 760 पाणी वाहून जात आहे. त्यामुळे आलमट्टीतून विसर्ग वाढविला आहे.
कोल्हापूर, सांगली तसेच सांगली जिल्ह्यात होत असलेल्या संततधार पावसाने कृष्णेच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ सुरु झाली आहे. त्यामुळे कर्नाटक पाटबंधारे विभागाने अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.