Weather Update: पुणे: राज्यात 18 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा जोर कायम राहणार असून, पूर येईल इतका मोठा पाऊस (रेड अलर्ट) मात्र कुठेही होणार नाही, असा अंदाज आठ दिवसांनंतर प्रथमच गुरुवारी हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान पुण्यासह 5 जिल्ह्यांना उद्या (शुक्रवारी) ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
सध्या मान्सूनचे वारे ओडिशा, गुजरात या भागांवर जास्त सक्रिय असून, तेथे कमी दाबाचा पट्टा कायम आहे. तसेच राजस्थान ते मध्य प्रदेश या भागात हवेची चक्रीय स्थिती आहे. त्यामुळे मध्य भारतात पावसाचा जोर कायम आहे. मात्र, महाराष्ट्रात कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात 15 जुलै रोजी मुसळधार, तर 16 ते 18 जुलैपर्यंत मध्यम पाऊस राहील. मराठवाड्यात 16 नंतर पावसाचा जोर पूर्ण कमी होत आहे.
महाराष्ट्रात पाऊस कमी होेणार
महाराष्ट्रात गुरुवारपासून राज्यातील अतिमुसळधार पावसाचा धोका कमी झाला असून, पावसाचा जोर कमी होण्यास सुरुवात झाली आहे. मोठा पाऊस फक्त मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा, रायगड या भागांत 15 रोजी शुक्रवारी होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यानंतर राज्यात 18 जुलैपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील.
ऑरेंज अलर्ट (मध्यम पाऊस) (15 जुलै)
पालघर, रायगड, पुणे, कोल्हापूर, सातारा
येलो अलर्ट (हलका पाऊस) (16 ते 18 जुलै)
नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, चंद्रपूर, बुलडाणा, गोंदिया, गडचिरोली