अकोला, दि.१२: जिल्ह्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०२२ व रब्बी हंगाम २०२२-२३ राबविण्यासाठी शासनाचे निर्देश आहेत. ह्या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी संबंधित बॅंक अथवा आपले सेवा केंद्र (CSC) येथे विमा हप्त्याच्या रकमेव्यतिरिक्त कोणतेही शुल्क अदा करु नये,असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. कांताप्पा खोत यांनी केले आहे.
यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, प्रधानमंत्री पीक विमा योजना सन २०२२-२३ अकोला जिल्ह्यात आयसीआयसीआय लोंबार्ड या विमा कंपनीमार्फत राबविण्यात येणार आहे. या योजने अंतर्गत सोयाबीन, मुग,उडीद, तूर, कापूस व ज्वारी इत्यादी पिकांसाठी शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२२ आहे. योजनेत सहभाग नोंदविण्यासाठी जवळच्या CSC(आपले सेवा) केंद्र अथवा बँकेतून विमा काढता येईल. योजनेत सहभाग नोंदविण्यासाठी शेतकऱ्यांनी भरावयाच्या विमा हप्ता रक्कमेव्यतिरिक्त कुठलेही शुल्क CSC केंद्र अथवा बँक यांना देऊ नये. अतिरिक्त शुल्क आकरण्यात येत असल्यास त्याबाबत प्रशासनास अवगत करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. कांताप्पा खोत यांनी केले आहे.