अकोला,दि. 12: जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे शेतीशी निगडीत विविध तक्रारींचे निवारण करण्यासाठी प्रत्येक सोमवारी आढावा घेणार आहेत. तरी जिल्ह्यातील सर्व संबंधित तक्रारदार शेतकऱ्यांनी कृषी संबंधित समस्या मांडण्याकरीता सोमवारी सकाळी साडेदहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी यांच्या दालनात कृषी संबधीत समस्याबाबत आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी कृषी उपसंचालक संध्या करवा, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कांताप्पा खोत, अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक नयन सिन्हा, जिल्हा परिषदचे कृषि विकास अधिकारी मुरली इंगळे, विनायक कहाळेकर, सर्व तालुका कृषी अधिकारी आदि उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्देश दिले की, कृषी संबधीत स्वयंचलित हवामान केंद्र, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, पिक कर्ज, सावकारी प्रकरण, बियाणे व खात मागणी, पोकरा इ.बाबत असलेल्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी दर सोमवारी सभा आयोजित करावी. याकरीता कृषी विभागाने पुढाकार घेऊन शेतकऱ्यांशी संपर्क साधावा. प्राप्त तक्रारीवर दर सोमवारी निवारण करण्यात येईल. तरी शेतकऱ्यांनी संबंधित कृषी विभागाकडे तक्रार नोंदवून संबंधित तक्रारदार शेतकऱ्यांनी स्वतः बैठकीस उपस्थित रहावे,असे आवाहन यावेळी केले.